नियमात बदल ; इंजिनिअर होण्यासाठी आता PCM विषय बंधनकारक नाही

 173 total views

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १२ मार्च – नवी दिल्ली – आता जर तुम्हाला इंजिनिअरिंग क्षेत्रात करियर करायचे असेल तर बारावीला गणित, फिजिक्स, केमिस्ट्री (PCM) हे विषय नसले तरी चालणार आहे. कारण ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (AICTE) तशा प्रकारचे नवे धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे इंजिनिअर होण्यासाठी गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे विषय असणे बंधनकारक नाही, आता हे विषय वैकल्पिक करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांसमोरचा मोठा अडथळा यामुळे दूर झाला आहे.इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा असेल तर आतापर्यंतच्या नियमानुसार बारावीला गणित, फिजिक्स, केमिस्ट्री (PCM) हे तीन विषय असणे अनिवार्य होते. आता ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या (AICTE) नव्या धोरणामुळे तो अडथळा दूर झाला आहे.

2021-22 या वर्षासाठी एक हॅन्डबुक ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (AICTE) जाहीर केले आहे. त्यामध्ये इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेण्यासाठी बारावीला कोणते विषय आवश्यक आहेत त्याची माहिती दिली आहे. गणित, फिजिक्स, केमिस्ट्री, कॉम्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, बायोलॉजी, इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिस, बायोटेक्नॉलॉजी, कृषी, बिजनेस स्टडीज् आणि इंजिनियरिंग ग्राफिक्स या विषयांपैकी कोणतेही तीन विषय बारावीसाठी असतील तरीही आता इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळणार आहे.

सामान्य विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेशासाठी 45 टक्के आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 40 टक्के गुण आवश्यक आहेत. काही घटकातून ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या या नव्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असले तरीही काही घटकातून यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन या निर्णयाने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरेल असे मत काही तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.