दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या सरावासाठी मिळणार ऑनलाइन प्रश्‍नसंच

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१३ मार्च । मुंबई । कोरोनामुळे मागच्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद होत्या. आता नोव्हेंबरपासून शाळा सुरु झाल्या, तरीही दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत कोणतीही अडचण येणार नाही, यादृष्टीने दहावी-बारावीतील 30 लाख विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) त्यांच्या संकेतस्थळावर सर्वच विषयांचे ऑनलाइन प्रश्‍नसंच उपलबध करून दिले जाणार आहेत.

‘एससीईआरटी’कडून मिळतील प्रश्‍नसंच
कोरोनाची स्थिती पाहून शाळा सुरु करण्याचे अधिकार त्या-त्या स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईनच होणार असून पालक-विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जात आहेत. या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी सराव करता यावा म्हणून ‘एससीईआरटी’कडून प्रश्‍नसंच उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
– वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

राज्यात कोरोना वाढत असल्याने दहावी-बारावी वगळता सर्वच शाळा 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. दहावीसाठी 16 लाख तर बारावीसाठी 14 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. बारावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य मंडळाने यापूर्वीच जाहीर केले आहे. आता पालक आणि विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे, त्यांच्या मनातील कोरोनाची भिती दूर होईल, यादृष्टीने नियोजन करण्यासाठी सल्लागार समिती नियुक्‍त केली आहे. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयांचा सराव करता येईल, त्यांना स्वयंअध्ययनासाठी मदत होईल आणि परीक्षेला जाण्यापूर्वी त्यांचा आत्मविश्‍वास वाढेल, या हेतूने प्रश्‍नसंच तयार केला जात आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, समाजशास्त्र व सर्व भाषांचा प्रश्‍नसंच तर बारावीच्या विद्यार्थ्यांना भाषांसह फिजिक्‍स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयांचे प्रश्‍नसंच ऑनलाइन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. प्रत्येक विषयांच्या घटकांवर किमान 15 ते 20 प्रश्‍न, असा प्रत्येक विषयांचा प्रश्‍नसंच असणार आहे. ‘एससीईआरटी’चे संचालक दिनकर टेमकर, उपसंचालक विकास गरड यांनी शालेय शिक्षणमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची तयारी सुरु केली आहे.

दहावीसाठी 16 लाख विद्यार्थी; 29 एप्रिल ते 29 मे या काळात दहावीच्या परीक्षेचे नियोजन
बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या काळात होईल; 14 लाख विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा
प्रत्येक विषयांच्या प्रत्येक घटकांवर 15 ते 20 प्रश्‍न असतील; विद्यार्थ्यांना सरावासाठी मिळणार प्रश्‍नसंच
दहावीचा निकाल ऑगस्टअखेर तर बारावीचा निकाल जुलैअखेरीस जाहीर व्हावा, यादृष्टीने बोर्डाचे नियोजन
प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा लेखी परीक्षेनंतर होणार; शाळा-महाविद्यालयांनी स्वतंत्र फी न घेण्याचे शिक्षणमंत्र्यांचे निर्देश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *