महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१५ मार्च । संभाजीनगर । कोरोना संकटाची सुरुवात होण्यापूर्वी म्हणजे फेब्रुवारी 2020 मध्ये सर्वसाधारण महागाई निर्देशांक 2.26 टक्के इतका होता. त्या तुलनेतही यंदाच्या फेब्रुवारीत हा दर दुपटीने वाढला आहे. फेब्रुवारी महिन्यात वार्षिक तत्वावर अन्नधान्याचे दर 9.40 टक्क्यांनी वाढले असून पेट्रोलियम पदार्थ व वायूची किंमत 6.50 टक्क्यांनी वाढली आहे. खाद्यवस्तुंंच्या किंमतीतही 0.51 टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्राथमिक श्रेणीतील वस्तुंच्या दरात 1.82 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये हा दर उणे 2.24 टक्के इतका होता. फेब्रुवारीमध्ये निर्मिती क्षेत्रातील वस्तुंच्या दरात वाढ झाली आहे. जानेवारीमधील 5.13 टक्क्यांच्या तुलनेत फेबु्रवारीत हा दर 5.81 टक्क्यांवर गेला आहे.
गेल्या काही काळात पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती वेगाने वाढल्या आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर सध्या सर्वकालीन उच्चांकी स्तरावर आहेत. मासिक तत्वावर इंधन आणि विजेची मागणीत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. ही मागणी जानेवारीतील उणे 4.78 टक्क्यांच्या तुलनेत फेबु्रवारीमध्ये 0.58 टक्के इतकी आहे. फेब्रुवारीमध्ये खाण्या-पिण्याच्या वस्तुंची महागाई जानेवारीतील उणे 0.26 टक्क्यांच्या तुलनेत 3.31 टक्क्यांवर गेली आहे. भाजीपाल्याचा महागाई दरही जानेवारीमधील उणे 20.82 टक्क्यांवरुन उणे 2.90 टक्क्यांवर आला आहे. सरकारकडून अलिकडेच किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांक जाहीर करण्यात आला होता. सीपीआय निर्देशांकाचे हे आकडे 5.03 टक्क्यांवर आले होते. एकीकडे महागाईचे आकडे वाढत असताना दुसरीकडे औद्योगिक उत्पादनात घट झाली आहे. जानेवारीमधील औद्योगिक उत्पादन 1.6 टक्क्यांनी घटले आहे.