पाण्यावर तरंगणारे भारतातील एकमेव नाईट क्लब

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१५ मार्च । पणजी । गोवा म्हटले, की विस्तीर्ण समुद्रकिनारे, सुंदर प्राचीन चर्चेस, चविष्ट सी फूड, त्याच्या जोडीने गोव्याची प्रसिद्ध फेनी, आणि अर्थातच बीचवरील धमाल नाईट पार्टीज हे दृश्य आपल्या डोळ्यांसमोर हटकून उभे राहते. पण आता गोव्यामध्ये असणारे एक खास नाईट क्लब पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.‘गॅलेक्सिया गॅलान्ते’ नामक हे नाईट क्लब चक्क पाण्यावर तरंगणारे, म्हणजेच एका आलिशान बोटीवर आहे. पणजीतील मांडोवी नदीमध्ये दोन तासांच्या बोटीच्या सफरीचा आनंद लुटून त्याचबरोबर बोटीवरील नाईट क्लब मध्ये ‘लाइव्ह’ संगीताच्या तालावर बेधुंद होऊन नृत्य करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने या फ्लोटिंग नाईटक्लब मध्ये येताना पहावयास मिळत आहेत.

या बोटीवर निरनिराळ्या चविष्ट खाद्य पदार्थांची आणि पेयांची रेलचेल असून, देशी पर्यटकांच्या सोबतच विदेशी पर्यटकांच्या खानपानाच्या सवयी लक्षात घेऊन त्यानुसार अनेकविध खाद्यपदार्थ आणि पेये या बोटीवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या बोटीवर आल्यानंतर सूर्यास्ताचा आनंद घेत निसर्गाचे सौंदर्य डोळे भरून पाहण्याची उत्तम संधी येथे पर्यटकांना मिळते.

या नाईट क्लब क्रुझ साठी माणशी एक हजार रुपयांचा खर्च येत असून, एखाद्याच्या खाद्यपदार्थ आणि पेयांच्या निवडीप्रमाणे हा खर्च वाढत जातो. सध्या हे फ्लोटिंग नाईट क्लब गोव्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरत असून, हे भारतातील एकमेव फ्लोटिंग नाईट क्लब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *