महाराष्ट्रातच करोना कसा वाढतोय ?अचानक वाढत असलेल्या रुग्णसंख्येवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शंका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १६ – मुंबई – मुंबईसह संपूर्ण राज्यात करोना रुग्णांची संख्या फेब्रुवारीपासून पुन्हा वाढू लागली आहे. रोजच्या रोज नवनवे आकडे समोर येत आहेत. सध्या रुग्णवाढीचा आकडा १५ हजारांच्याही पुढं गेला आहे. त्यामुळं राज्य सरकारनं कठोर निर्बंध लादण्याची भाषा सुरू केली आहे. स्थानिक पातळीवर अनेक जिल्हा प्रशासनांनी निर्बंध लागू देखील केले आहेत. अचानक वाढत असलेल्या रुग्णसंख्येवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मात्र शंका उपस्थित केली आहे. (MNS on Corona In Maharashtra)

मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी या संदर्भात एक खोचक ट्वीट केलं आहे. ‘महाराष्ट्राला लागून असलेल्या गोवा, गुजरात कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यांत करोना वाढत नाही. महाराष्ट्रात मात्र वाढतोय. करोनाचं महाराष्ट्रावर प्रेम आहे की महाराष्ट्र सरकारच करोनावर प्रेम आहे? की स्वतःचं अपयश झाकण्यासाठी टाळे बंदी आणि करोनाचा वापर होतोय?,’ असा बोचरा सवाल देशपांडे यांनी केला आहे.

करोनाच्या नावाखाली लादल्या जाणाऱ्या निर्बंधांना मनसेचा सुरुवातीपासूनच विरोध आहे. मनसेनं याआधी दारूची दुकाने, रेल्वे सुरू करण्यासाठी आंदोलनंही केली आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वत: मास्क घालत नाहीत. इतकंच नव्हे तर मास्क न घालण्याचं बिनधास्त समर्थन करत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अधिकच आक्रमक झाली आहे.

देशपांडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. ‘करोना रुग्ण संख्या कमी होते तेव्हा आदित्य ठाकरे यांचा ‘वरळी पॅटर्न’ आणि करोना रुग्ण वाढले की लोक बेजबाबदार अशी टीका देशपांडे यांनी केली आहे. ‘जनतेनं काम करायचीच नाहीत का? करोनाच्या नावावर लोकांना फक्त घाबरवायचं का? तुमची घाणेरडी प्रकरणं बाहेर येताहेत म्हणून करोना वाढतोय का आणि एवढे कडक निर्बंध लावणार असाल तर तर जनतेला काही सवलती देणार का?,’ असा सवालही देशपांडे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *