महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १८ – मुंबई – कोरोना महामारीचा परदेशात काम करणाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळेच गेल्या दोन वर्षांत जागतिक पातळीवर अनेक बदल दिसू लागले आहेत. बोस्टन कन्सल्टिंग समूहाच्या ताज्या अहवालानुसार जगातील सुमारे ५० टक्के लोक इतर देशांत जाऊन नोकरी करू इच्छितात. मात्र आता अशा लोकांचा श्रीमंत देश नव्हे तर लहान देशांकडे जास्त कल असल्याचे दिसते. काेरोनाची परिस्थिती योग्य प्रकारे हाताळणाऱ्या देशांना त्यांची जास्त पसंती आहे. त्यामुळेच दहा वर्षांत पहिल्यांदाच अमेरिकेने आघाडीची जागा गमावली आहे. अमेरिकेच्या जागी आता कॅनडा आले आहे. एका अहवालानुसार कोरोनाची स्थिती बेपर्वाईने हाताळणे, राजकारण, राष्ट्रवादी घटना व सामाजिक अस्थैर्यामुळे अमेरिकेची घसरण झाली आहे.
अहवालानुसार युरोपीय देशांत काम करण्याबाबत विश्वास कमी झाला. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या इटली, स्पेन आघाडीच्या १० देशांतून बाहेर आहेत. फ्रान्स देखील बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. जपानमध्ये जास्त सुधारणा झाली. दहा क्रमांकावरून जपान सहाव्या स्थानी आले.
परदेशात काम करण्याचा ट्रेंड केवळ ९ देशांत वाढला आहे. त्यात पाकिस्तान, ब्राझील, बेल्जियमही आहे. भारताच्या दृष्टीने ८७ टक्के लोक परदेशात काम करू इच्छितात. काेरोनामुळे मात्र त्यात ५ टक्के घट झाली. पाकिस्तानात मात्र त्यात ५ टक्के वाढ झाली. सर्वाधिक ३५ टक्के वाढ इटलीत नोंदली गेली. तेथे परदेशात नोकरी करण्याची इच्छा असलेल्यांचे प्रमाण ५५ टक्क्यांहून ९० टक्के झाले आहे.