महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२० मार्च । शिर्डी ।शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांच्याकडून प्रसाद रुपये बुंदीचे लाडू पाकिटांची 20 मार्च पासून विक्री करण्यात येणार आहे. गेट नंबर 4 आणि हनुमान मंदिरा शेजारील साई कॉम्प्लेक्स येथे लाडू विक्री काऊंटर सुरू करण्यात आले असल्याची माहिती श्री साईबाबा देवस्थान कडून देण्यात आली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे 17 मार्च 2020 पासून शिर्डी साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद केले होते. त्यामुळे सशुल्क लाडू प्रसाद पाकीट विक्री पूर्णता बंद केली होती. राज्य शासनाच्या आदेशानुसार 16 नोव्हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटींवर खुले केले आहे. तसेच कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून लाडू प्रसाद उत्पादन पुन्हा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले आहे.
6 मार्च 2021 पासून श्रींच्या दर्शनासाठी भक्तांना दर्शन झाल्यानंतर दर्शन रांगेत अंदाजे 50 ग्रॅम भजनाचा एक बुंदी लाडू प्रसाद रूपाने पाकिटातून विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. साई भक्तांकडून होत असलेल्या मागणीनुसार 20 मार्चपासून लाडू प्रसाद विक्री सुरू करण्यात येणार आहे. तीन लाडू असलेल्या पाकीटा साठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर 25 रुपयांप्रमाणे विक्री केली जाणार आहे.