महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२० मार्च । अहमदाबाद । भारत -इंग्लंड यांच्यामध्ये उद्या टी-20 मालिकेचा पाचवा सामना रंगणार आहे. उभय संघांनी प्रत्येकी दोन लढतींमध्ये विजय मिळवला असून आता शनिवारी होणाऱया लढतीत दोन्ही संघ मालिका विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसतील.विराट कोहलीच्या ब्रिगेडने मागील सात मालिकांमध्ये पराभव पाहिलेला नाही. ओएन मॉर्गनचा इंग्लंड संघही आठ मालिकांमध्ये हरलेला नाहीए. याच पार्श्वभूमीवर उद्याच्या लढतीत पराभूत होणाऱया संघाची विजयी मालिका खंडित होणार आहे हे निश्चित. यामुळे रोमहर्षक लढत क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळेल यात शंका नाही.
भारताने 2019 सालामध्ये वेस्ट इंडीजला 3-0 अशा फरकाने धूळ चारली. तिथपासून टीम इंडियाच्या विजयी मालिकांचा श्रीगणेशा झाला. या दरम्यान भारत -दक्षिण आफ्रिका यांच्यामधील टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली. या मालिकेव्यतिरिक्त टीम इंडियाने एकही मालिका या कालावधीत गमावली नाहीए. यावेळी भारताने दोन वेळा वेस्ट इंडीजला आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका व बांगलादेश यांना प्रत्येकी एक वेळा हरवले आहे.
अंतिम अकरामध्ये कोणाला संधी?
टीम इंडियाने चौथा टी-20 सामना जिंकलाय. त्यामुळे अखेरच्या सामन्यात बदल करण्यात येईल असे वाटत नाही. मात्र लोकेश राहुलचा फॉर्म हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे त्याला वगळून इशान किशन व शिखर धवनला संधी देण्यात आल्यास आश्चर्य वाटणार नाही. तसेच टी. नटराजन यानेही फिटनेस टेस्ट पास करून संघात प्रवेश केलाय. या खेळाडूचाही अंतिम अकरासाठी विचार होऊ शकतो.
आजची पाचवी टी-20 लढत
भारत -इंग्लंड, अहमदाबाद
सायंकाळी 7 वाजता