महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २३ – पुणे – राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट आणखीनच गडद होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोनाबाधितांबरोबरच, कोरोनामुळे दगावणाऱ्यांच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या पार्श्वभूमीवर माध्यमांना राज्यातील कोरोना परिस्थती व लसीकरण कार्यक्रमाबाबत माहिती दिली. सध्या दररोज तीन लाख लोकांचे लसीकरण केले जात आहे, तीन महिन्यात लसीकरण कार्यक्रम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे यावेळी आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
राजेश टोपे म्हणाले, राज्यात दररोज ३ लाख लोकांचे लसीकरण होत आहे. खासगी ठिकाणे वाढवत आहोत व ग्रामीण भागात उपकेंद्रापर्यंत लसीकरणाच्या दृष्टीने लोकांना सुलभता व्हावी, यासाठी आम्ही व्यवस्था करत आहोत. आता २० बेडेड हॉस्पिटलपर्यंत देखील लसीकरणाची व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे येथून पुढे आणखी जे जे लोक लसीकरणाची मागणी करतील, सगळे अर्ज आम्ही पुढे पाठवून मंजुरी घेऊ, आम्हाला मोठ्याप्रमाणावर लसीकरण करायचे आहे. आमचा पूर्ण प्रयत्न आहे तीन महिन्यात लसीकरण कार्यक्रम पूर्ण संपवायचा असल्यामुळे लसीकरणावर आम्ही विशेष लक्ष दिलेले आहे.
ज्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे, त्यांच्यावर त्यांनी स्वतः देखील लक्ष द्यावे आणि अनेकजण सोसायटीमध्ये राहतात, तेथील पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांच्यावर लक्ष ठेवावे. आमचे आरोग्य कर्मचारी देखील त्यांच्यावर ठेवून आहेत, त्यामुळे संसर्ग कसा टाळता येईल, या दृष्टीने आपण सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे देखील टोपेंनी यावेळी सांगितले.