महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २७– मुंबई – दहावी बारावी परीक्षा केंद्रावर पालक आणि शुभेच्छा देणार्यांची गर्दी मोठी असते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालक व शुभेच्छा देणार्यांना परीक्षा केंद्रावर मज्जाव असणार आहे. अशी माहिती राज्य मंडळाने दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत एप्रिल-मे महिन्यात घेण्यात येणार्या दहावी-बारावीच्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार लेखी परीक्षेसाठी वाढीव वेळ, लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक कार्य, परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा, परीक्षा देताना घ्यावयाची दक्षता आदी महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. पेपर सुरु होण्याअगोदर केंद्रावरील वाढती गर्दी लक्षात घेवून राज्य मंडळाने कडक उपाययोजनाही जारी केल्या आहेत. केंद्राबाहेर पालकांच्या वाढत्या गर्दीला मज्जाव असणार आहे. तसेच शाळांना स्वच्छता आणि सॅनिटाईझर सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लेखी परीक्षेतील पेपरची वेळ 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे; तर 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे वाढविण्यात आली आहे. यंदा दहावीची विज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा मंडळाच्या प्रचलित पद्धतीने घेतली जाणार नाही. त्याऐवजी प्रात्यक्षिकांवर आधारित विशिष्ट लेखनकार्य प्रकल्प, प्रात्यक्षिक वही व गृहपाठ यांचा समावेश असेल. प्रात्यक्षिकांवर आधारित कार्य लेखी परीक्षेनंतर दिनांक 21 मे ते 10 जून या कालावधीत द्यावे लागणार आहे. अधिक आणि सविस्तर माहिती https://mahahsscboard.in/ या वेबसाइटवर पाहता येतील.