![]()
महाराष्ट्र 24- भोसरी, १६ ऑगस्ट २०२६ : देशभर स्वातंत्र्यदिनाचा जयघोष सुरू असतानाच भोसरीत मात्र अंतर्मनाच्या स्वातंत्र्याचा जागर झाला. संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित ‘मुक्ती पर्वा’त बाहेरच्या बेड्या तुटल्या म्हणून माणूस स्वतंत्र होत नाही; अज्ञान, अहंकार आणि भेदभावाच्या बेड्या तुटल्या तरच खरी मुक्ती मिळते, असा आध्यात्मिक संदेश देण्यात आला.
संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी येथे आ. सखाराम लवटे (मुंबई) यांच्या सान्निध्यात सकाळी साडेदहा ते दुपारी दीडपर्यंत विशेष सत्संग सोहळा झाला. भोसरी, चाकण, राजगुरुनगर आणि परिसरातून हजारो श्रद्धाळूंनी उपस्थिती लावत भक्तीमय वातावरण निर्माण केले.
सत्संगात ‘मुक्ती पर्वा’चा इतिहास, त्याचे आध्यात्मिक महत्त्व आणि सत्याच्या प्रचारासाठी जीवन अर्पण करणाऱ्या संत-महात्म्यांच्या त्यागाचा आढावा घेण्यात आला. ‘मुक्ती पर्व’ हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून सत्य, सेवा, समर्पण आणि मानवतेसाठी आयुष्य वेचणाऱ्या संत विभूतींचे स्मरण करण्याचा दिवस असल्याचे सांगण्यात आले.
सत्याचा संदेश देताना अनेक संतांना संकटे, अडचणी आणि विरोधाचा सामना करावा लागला. मात्र श्रद्धा, सेवा आणि मानवतेचा धागा त्यांनी कधी सोडला नाही. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेत प्रेम, नम्रता आणि बंधुभावाने सत्याच्या मार्गावर चालण्याचे आवाहन करण्यात आले.
‘मुक्ती पर्वा’ची सुरुवात १९६४ मध्ये जगत माता बुद्धवंती जी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ झाली. पुढे शहनशाह बाबा अवतार सिंह जी, संत लाभ सिंहजी, निरंकारी राजमाता आणि माता सविंदरजी यांच्या स्मृतींशी हा दिवस जोडला गेला. बाबा गुरबचन सिंहजी यांनी या दिवसाला ‘मुक्ती पर्व’ म्हणून प्रतिष्ठा दिली.
सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या संदेशानुसार, मनाच्या बंधनांतून मुक्त होणे हीच खरी मुक्ती आहे. ब्रह्मज्ञानाची ज्योत माणसाला स्वतःच्या वास्तविक स्वरूपाची जाणीव करून देते आणि प्रेम, बंधुभाव व सद्भावनेचा मार्ग दाखवते.
म्हणजेच, राष्ट्राला स्वातंत्र्य मिळाले म्हणून काम संपले नाही; आता मनालाही स्वातंत्र्य देण्याची वेळ आली आहे—हा ‘मुक्ती पर्वा’चा नेमका आणि मार्मिक संदेश ठरला.
