मेरे साई- श्रद्धा और सबुरी; या भूमिकेत येणार भार्गवी चिरमुले प्रेक्षकांच्या भेटीला ; पहा नवा लूक

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. १ एप्रिल । अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने तिच्या अभिनय कौशल्याने आजवर चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. लवकरत भार्गवी एका वेगळ्या भूमिकेत चाहत्यांच्या भेटीला येतेय. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई- श्रद्धा और सबुरी मालिकेत भार्गवी महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

या मालिकेच्या आगामी कथानकात भार्गवी चिरमुले एका अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ती चंद्रा बोरकर नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे, जी साईंची बहीण आहे. दोन मुलं असलेले तिचे सुखी कुटुंब आहे. परंतु, एके दिवशी तिचा नवरा ज्ञानप्राप्तीसाठी आपल्या कुटुंबाला सोडून निघून जातो, कारण कुटुंबाप्रती असलेल्या आपल्या जबाबदार्‍या म्हणजे त्याला आपल्या मार्गातला अडथळा वाटतो. स्वाभाविकपणे चंद्रावर आकाशच कोसळते. साई आपल्या बहिणीच्या पाठीशी उभे राहतात आणि चंद्राच्या पतीला ही जाणीव करून देतात की, आपल्या जबाबदार्‍या पूर्ण केल्यावरच ज्ञानप्राप्ती होते.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना भार्गवी म्हणाली, “मेरे साई मालिकेतल्या या महत्त्वाच्या कथानकात सहभागी होता आल्याचा आणि साईंच्या बहिणीची भूमिका साकारण्याचा मला आनंद आहे. साई बाबांनी स्त्री-पुरुष असा भेद कधीच केला नाही, आणि ते नेहमी खर्‍याच्या बाजूने उभे राहिले. या कथानकात देखील हेच पुन्हा दिसून येईल. पुढे ती म्हणाली, “या भूमिकेच्या माध्यमातून साईंनी माझ्यावर त्यांच्या आशीर्वादाचा वर्षाव केला आहे.”

आपल्या पतीने आणि कुटुंबाने सोडून दिलेल्या स्त्रीला आपल्या समाजात किती त्रास सोसावा लागतो याचे चित्रण या भागात दिसेल. ‘मेरे साई- श्रद्धा और सबुरी मालिकेत’ अभिनेता तुषार दळवी साईंची मुख्य भूमिका साकारत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *