महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । सातारा । दि. ३ एप्रिल ।पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग आणि सेवा रस्त्यांची अवस्था अतिशय खराब झाली असतानाही पाच टक्के टोल वसुलीत वाढ केल्याने खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. दरवाढ ही अन्यायकारक आणि प्रवासी, नागरिकांच्या संयमाचा अंत पाहणारी आहे, अशी टीका उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
पुणे-सातारा महामार्गाचे काम २०१३ मध्ये पूर्ण होणार होते. मात्र गेली आठ वर्षे ओलांडूनही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे टोलवाढ करण्याऐवजी कपात केली पाहिजे, अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे. सातारा ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करताना खाचखळग्यांचा सामना करावा लागतो. काही ठिकाणचे सेवा रस्ते अत्यंत खराब असून काही ठिकाणी ते अस्तित्वातही नाहीत. महामार्गावर दिशादर्शक फलक नाहीत त्यामुळे नवख्या वाहनचालकांना त्यामुळे काहीच समजत नाही. महामार्गावर शेजारील कर्नाटक राज्यातील याच राष्ट्रीय महामार्गावर अनेक टोलनाक्यावर कमी टोल घेऊनही चांगल्या सुविधा दिल्या जातात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल नाके चालवणाऱ्या रिलायन्स व्यवस्थापनाने टोल दरवाढ करून, प्रवासी आणि वाहनचालक/धारकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यांनी केलेली दरवाढ त्वरीत मागे घ्यावी, अशी मागणी खासदार उदयनराजे यांनी केली आहे.