महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद ; पुण्यात कोरोना लसीकरणाचा उच्चांक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – दि. ४ एप्रिल – राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढत होत असताना दुसरीकडे कोरोना लसीकरण मोहिमही जोरदार सुरु आहे. महाराष्ट्रात काल (3 एप्रिल) एकाच दिवशी 4 लाख 62 हजार 735 नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेनेचे कौतुक केले आहे. (Maharashtra highest single day covid-19 vaccinations)

पुणे जिल्हा हा सर्वाधिक लस देणारा जिल्हा ठरला आहे. पुण्यात राज्यात सर्वाधिक 76 हजार 594 जणांना कोरोना लस लस देण्यात आली. त्यापाठोपाठ मुंबई उपनगर (46 हजार 937), नागपूर (41 हजार 556), ठाणे (33हजार 490) या जिल्ह्यांनी लसीकरणात आघाडी घेतली आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्राने आतापर्यंत सुमारे 73 लाख 47 हजार 429 जणांना कोरोनाचे लसीकरण केले आहे. त्यामुळे राज्यात देशात अग्रभागी राहण्यात सातत्य राखले आहे. यामुळे गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या सर्व राज्यांना मागे टाकले आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रसेर राहिले आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यात येत आहे. सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. दरम्यान यंत्रणेच्या प्रभावी कामगिरीमुळे आणि नागरिकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे काल महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रमाची कामगिरी बजावली आहे. अशाच पद्धतीने लसीकरणाला वेग दिल्यास लवकरच राज्यात दिवसाला सहा लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात गेल्या 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यात पहिल्याच दिवशी 3 लाखांहून अधिक जणांना लस देऊन राज्याने उच्चांक गाठला होता. काल 3 एप्रिल रोजी राज्यभर 4102 लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंतची सर्वोच्च संख्या पार करीत 4 लाख 62 हजार जणांना लस देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *