इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गडकिल्‍ल्‍यांवर दारू पिणाऱ्यांना सहा महिने तुरुंगवास, १० हजारांचा दंड .

Spread the love

महाराष्ट्र २४ – महाराष्‍ट्रातील गडकिल्‍ले हे राज्‍याच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार आहेत. या गडकिल्‍ल्‍यांवर गेल्‍या काही काळात दारूपार्ट्या करून धिंगाणा घालण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्‍यांना आळा घालण्यासाठी आता गडकिल्‍ल्‍यांवर दारू पिऊन गैरवर्तन करणाऱ्यांना सहा महिन्यांचा सश्रम तुरुंगवास तसेच १० हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार आहे. राज्‍याच्या गृहविभागाने हा निर्णय घेतला आहे.

राज्यात ३५०च्या वर गडकिल्‍ले आहेत. मात्र गेल्‍या काही काळात या किल्‍ल्‍यांना ‘पिकनिक स्‍पॉट’ समजून पार्ट्या करणे, दारू पिऊन धिंगाणा घालण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. शिवप्रेमींनी अशा दारूड्यांना चोप दिल्‍याचेही समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्‍य सरकारने गडकिल्‍ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्‍ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ८५ अंतर्गत आता गडकिल्‍ल्‍यांवर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना आता सहा महिन्यांचा तुरुंगवास व १० हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. पुन्हा अशा अपराधाची पुनरावृत्ती झाल्‍यास शिक्षेचा कालावधी एका वर्षाचा असणार आहे. या दारूबाजांवर पोलिस तसेच राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. या शिक्षेबाबतच्या तरतुदी सर्व गडकिल्ले व पुरातन वास्‍तूंच्या दर्शनी भागात नागरिकांच्या माहितीस्‍तव लावण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *