महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ; तर या खात्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. ६ एप्रिल । अखेर काल गृहमंत्री पदाचा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. याप्रकरणी सीबीआयला मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले असून, १५ दिवसांत प्राथमिक अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान, आता अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राज्याच्या गृहमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू होत्या. अखेर याबाबत निर्णय झाला असून, गृहमंत्रालयाचा कार्यभार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उत्पादन शुल्क आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडे पाठवला आहे. तसेच, आता दिलीप वळसे पाटील यांच्याकडे येथून पुढे गृहमंत्रालयाची जबाबदारी राहणार असल्याचेही कळवले आहे. तर, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे असलेला कामगार विभागाचा कार्यभार आता हसन मुश्रीफ यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून सोपवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर गृहमंत्रीपद दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे देण्याची इच्छा होती. पण दिलीप वळसे-पाटील यांनी प्रकृतीचे कारण देत गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे हे पद अनिल देशमुख यांच्याकडे देण्यात आले होते. पण आता पुन्हा एकदा वळसे-पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपद आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *