खुनाला उत्तर खुनाने देणं हे सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी योग्य चित्र राहणार नाही ; राज ठाकरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. ६ एप्रिल – मनसेचे ठाण्यातील पदाधिकारी जमील शेख यांच्या खून प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते नजीब मुल्ला यांचं नाव आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला निर्वाणीचा इशारा दिला. ‘शरद पवार यांना अशी मंडळी पक्षात सांभाळायची असतील तर इतरांचे हातही बांधलेले नसतात,’ असं सूचक वक्तव्य राज यांनी केलं आहे. तसेच त्यांनी ठाण्याचे राष्ट्रवादी नगरसेवक नजीब मुल्लांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली आहे. खुनाला उत्तर खुनाने देणं हे सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी योग्य चित्र राहणार नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांनी आज आपल्या निवासस्थानी कृष्णकुंजवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या अनेक मुद्यांना हात घातला आहे. यावेळी त्यांनी अनिल देशमुख भ्रष्टाचार प्रकरणावरून परमबीर सिंह यांच्यावरही निशाणा साधला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या कारभाराबाबतही चिमटे काढले आहे. त्याचबरोबर मनसे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येबाबतही गंभीर इशारा दिला आहे. तसेच शरद पवार यांची प्रत्यक्षात भेट घेऊन नजीब मुल्लावर कारवाई करण्याबाबत चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

सत्ताधारी पक्षाचे लोकचं जर नागरिकांना दिवसाढवळ्या मारत असतील तर हे महाराष्ट्रासाठी योग्य नाही. याबाबत सरकार काय पावलं उचलतयं हे मी पाहणारचं आहे. नाहीतर दुसऱ्यांचेही हात बांधले नाहीत. पण खुनाला उत्तर खुनानं देणं हे चित्र महाराष्ट्रासाठी योग्य नाही, असा सक्त इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला आहे. त्याचबरोबर शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन नजीब मुल्लावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *