प्रकाश आंबेडकर यांनी दिला सरकारला निर्वाणीचा इशारा ; लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरु

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. ७ एप्रिल ।राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस चिंताजनक वाढ होत आहे. राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लागू केले आहेत. पण विकेंड लॉकडाऊन सांगत सातही दिवस लॉकडाऊनची स्थिती निर्माण केली जात असल्याचा आरोप सरकारवर करण्यात येत आहे. सरकारच्या या निर्णयाला अनेक स्तरातून विरोध होत आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

लॉकडाऊनला विरोध करण्याच्या तयारीत राज्यातील नागरिक आहेत. राज्य सरकार लॉकडाऊनच्या काळात कोणतीही मदत करायला तयार नाही. राज्य सरकारने लोकांनी विरोध करण्यापूर्वी लॉकडाऊनचा निर्णय परत घ्यावा. सरकारने निर्णय मागे घेतला नाही, तर अनेक लोक दुकाने सुरु करायला लागतील. तेव्हा आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. सरकारला आम्हाला अटक करायची असेल तर करा. पण आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्र सरकारच्या हलगर्जीपणामुळे वाढत आहे. जे जम्बो कोविड सेंटर गेल्या वर्षी सुरुवातीला सरकार चालवत होते. ते नंतर खाबूगिरीसाठी नातेवाईक आणि एनजीओंना चालवायला दिले, अशी घणाघाती टीकाही आंबेडकरांनी राज्य सरकावर केली आहे. सर्वसामान्य नागरिक आणि छोटे व्यापारी, व्यावसायिक लॉकडाऊनमुळे भरडले जात आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाऊनच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. अन्यथा राजकीय दृष्टीनेच विचार करावा लागेल, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *