राज्‍य सरकारच्या निर्णयाविरोधात पुण्यात व्यापाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन ;

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. ८ एप्रिल । राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात आज (गुरूवार) पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी रस्त्यावरील विजय टॉकीज ते नाना पेठेतील क्वॉर्टर गेटपर्यंत सहा फुटांचे अंतर ठेवत साखळी करण्यात आली. यावेळी, व्यापाऱ्यांची दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाचा निषेध, मेरा पेट मेरी मजबुरी, दुकान खोलना है जरूरी आदी माहितीपर फलक झळकाविण्यात आले. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या आंदोलनात दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह व्यावसायिक पांढर्‍या रंगाचे वस्त्र परिधान करून सहभागी झाले होते.

पुणे व्यापारी महासंघाशी संलग्नित शहरातील 82 व्यापारी संघटना आहेत. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील किरकोळ व घाऊक अशी जवळपास 40 हजार दुकाने बंद आहेत. यामध्ये, शहरातील मध्यवर्ती गुरूवार, शुक्रवार, कसबा, नाना, भवानी, रविवार, बुधवार, रास्ता, मंगळवार पेठ, शिवाजी रस्ता येथील सराफ, होजिअरी व कापड, ऑटोमोबाईल, प्लायवूड, टिंबर, स्टेनलेस स्टील, नॉन फेरस मेटल, पेपर, प्लास्टिक, इलेक्ट्रिक अ‍ॅन्ड इलेक्ट्रॉनिक, मशिनरी व वेल्डींग, कॉम्पुटर, टॉईज, वॉच, सायकल, केमिकल निगडीत व्यापाऱ्यांचा समावेश आहे. या बाजारपेठांमधून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात साहित्य पाठविले जाते. बंदमुळे पुरवठा साखळी खंडीत झाली असून, सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *