महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कृषी विभागाला आदेश

Spread the love

महाराष्ट्र २४- महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरी, जंगलातील फळे, मध यासाठी प्रसिद्ध आहे. स्ट्रॉबेरी आणि फळांवर संशोधन होण्याची गरज आहे. महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरीसाठी संशोधन केंद्र उभारण्यासाठी आवश्यक ती तयारी करा, गरज पडल्यास परदेशी तंत्रज्ञानाची मदत घ्या, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी विभागाला दिले. या संशोधन केंद्रात स्ट्रॉबेरीसह संत्री, मोसंबी, डाळिंब आणि द्राक्ष यांचेही संशोधन झाल्यास त्याचा फायदा संपूर्ण राज्याला होईल. याबाबत तातडीने अहवाल सादर करावा, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

महाबळेश्वरमधील राजभवनाच्या सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाबळेश्वर व पाचगणी पर्यटन कृती आराखडय़ासंदर्भात बैठक झाली. या वेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार अजय चौधरी, जिल्हाधिकारी शेखरसिंह, मुख्य वनसंरक्षक डॉ. बेन क्लेमंट, जिल्हा पोलीस प्रमुख तेजश्री सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, उपवनसंरक्षक भारत हाडा आदी उपस्थित होते.

प्रत्येक शहराला एक खास चेहरा असतो; तशा पद्धतीने महाबळेश्वरकडे पाहिले पाहिजे आणि त्या पद्धतीने विकसित झाले पाहिजे. येथील घरे, हॉटेल, बंगले, दुकाने, रस्ते, संरक्षक कठडे, उद्याने चौक यांचा विकास करताना शहराचा एक चेहरा समोर आला पाहिजे. वरून पाहिले तरी महाबळेश्वर ओळखता आले पाहिजे. येथील घरे, रस्ते पाहिले की महाबळेश्वरची ओळख पटली पाहिजे. इतरत्र कोठेही दिसणार नाहीत अशा सर्व गोष्टींचा समावेश यात केला पाहिजे, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘भूतान’चे उदाहरण दिले. भूतान या छोटय़ा देशाला करता येत असेल तर मग आपल्याला का करता येऊ शकत नाही, असा सवालही त्यांनी अधिकाऱयांना केला.

गर्दीचे विक्रेंद्रीकरण झाले पाहिजे
महाबळेश्वरमध्ये हंगामात गर्दीचा उच्चांक गाठला जातो. तेव्हा सर्व समस्या उभ्या राहतात. त्यामुळे शहरातील गर्दीचे विकेंद्रीकरण केले पाहिजे. त्यासाठी महाबळेश्वरजवळच्या सर्व पर्यटन स्थळांचाही विकास झाला पाहिजे. किल्ले प्रतापगड, तापोळा अथवा येथील अभयारण्य असेल तेथे सहज जाता येईल, अशा सर्व सुविधा पर्यटकांना मिळाल्या पाहिजेत. महाबळेश्वरला जोडले जाईल असे सर्कल तयार करून या सर्कलचाही विकास झाला तरच गर्दीचे विकेंद्रीकरण होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *