महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. १० एप्रिल । राज्यातील सर्वसामान्य दुकाने बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात व्यापार्यांनी ठोकलेला शड्डू कायम आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शुक्रवारी पुकारलेले आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र निर्बंधांसह दुकाने उघडण्यास आता सरकारने परवानगी दिली नाही, तर सोमवारी सर्व व्यापारी स्वतःच दुकाने उघडतील, असा इशारा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरने दिला आहे.
चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेडने मात्र सोमवारी दुकाने खुली करण्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. चेंबरचे अध्यक्ष मितेश मोदी म्हणाले की, राज्यातील 700 व्यापारी संघटना चेंबरला संलग्न आहेत. त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय थेट दुकाने उघडण्याचा निर्णय घेता येणार नाही. मुख्यमंत्र्यांसोबत बुधवारी चर्चा झाल्यानंतर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनाही मध्यस्थीचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्यानुसार आठवड्यातील चार किंवा पाच दिवस आणि ठराविक वेळेत दुकाने सुरू ठेवण्याचा सुवर्णमध्य संघटनेने शासनाला सुचवला आहे. त्यात मुख्यमंत्र्यांनी आज बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीकडे व्यापार्यांचे लक्ष आहे. दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला नाही, तर त्यांची भूमिका जाणून घेतली जाईल. त्यानंतरच चेंबर स्वतःची भूमिका जाहीर करेल, असेही मोदी यांनी सांगितले.