लोकांचे जीव वाचवण्यासाठी कोरोना साखळी तोडणे गरजेचे ! ;हलगर्जीपणा करु नका; उपमुख्यमंत्री अजित पवार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. १० एप्रिल ।प्रशासनाने अनेक उपाययोजना करूनही बारामती शहर आणि तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा करु नका. कोरोनाची साखळी तोडली तरच अनेकांचे जीव वाचणार आहेत. त्यामुळे हा विषय सर्वांनी गांभीर्याने घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात ‘कोरोना विषाणू निर्मूलन आढावा बैठक’ आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

सद्यस्थितीत बारामती तालुक्यात शासन आणि प्रशासन यांच्या मार्फत विविध उपाययोजना करून देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ही बाब चिंतेची असून कोरोना साखळी तोडण्याचा विषय सर्वांनी गांर्भीयाने घेणे आवश्यक आहे. बारामती तालुक्यातील प्रत्येक रूग्णालयाचे फायर ऑडीट प्राधान्याने करून घेण्यात यावे. प्रशासनाने याबाबत खबरदारी घ्यावी, असेही अजित पवार म्हणाले.

सांगली जिल्ह्यात मोबाईल कोरोना चाचणी व्हॅन प्रत्येक गावात जावून नागरिकांची कोरोनाची तपासणी केली जाते, त्याच धर्तीवर बारामती तालुक्यातही मोबाईल व्हॅन द्वारे कोरोना तपासणी करण्यात यावी. रूग्णांना कोणताही भेदभाव न ठेवता तात्काळ बेड उपलब्ध करून देण्यात यावे. बारामती तालुक्यातील वृध्दाश्रमामध्ये जावून तेथील वृध्दांची व कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात यावी. आरोग्य सेवेकरीता मनुष्यबळाची कमतरता भासत असल्यास शिक्षकांच्या सेवा घेण्यात याव्यात.

कोविडशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधनसामुग्री याची कमतरता भासल्यास औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांची मदत घ्यावी. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने कठोर निर्बंध लावले असतानादेखील नागरिकांकडून निर्बंधांचे पालन केले जात नाही, हे योग्य नाही. सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे. जे नागरिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत नाहीत, अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. लसीकरणाचा वेग वाढवावा. सॅनिटायझरचा तसेच मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर राखावे व प्रशासनास सहकार्य करावे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *