महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।सातारा । दि.१२ एप्रिल । विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात वादळी वाऱ्यासह आलेल्या वळवाच्या पावसाने सांगली आणि कोल्हापूरकरांना काल सायंकाळी चांगलेच झोडपून काढले. अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले होते.
कोल्हापूर जिह्यात गेल्या महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. यावेळी 39 ते 49 अंशापर्यंत कोल्हापूरचा पारा गेल्याने सर्वांची लाहीलाही होत होती, तर गेल्या दोन-चार दिवसांपासून जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. काल अचानक ढग दाटून आले. संध्याकाळी आठनंतर वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे पाऊण तास पावसाने हजेरी लावली. यामुळे हवेत गारवा निर्माण होऊन उन्हामुळे हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला.
सांगली शहर व जिल्ह्याच्या काही भागात विजेच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले. अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाल्याने निम्मे शहर अंधारात बुडाले होते.