आरोग्यदायी आणि स्वादिष्ट दही ;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- दह्यामध्ये दुधापेक्षा अधिक प्रमाणात प्रथिने आणि जीवनसत्वे असतात, तसेच दुधाच्या मानाने दही पचण्यास जास्त हलके असते. दह्याच्या सेवनाने पाचनशक्ती चांगली राहते. याशिवाय आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेली अनेक पोषक तत्वे दह्यामध्ये आहेत. दही हे प्रथिनांचे प्रमुख स्रोत असून, ही प्रथिने दुधात असलेल्या प्रथिनांच्या मानाने पचविण्यास हलकी असतात. ज्या व्यक्तींना दुधामध्ये असलेल्या लॅक्टोज या तत्वाची अॅलर्जी असते, त्या व्यक्तींना दही खाण्याचा सल्ला आहारतज्ञ देतात. दुधाचे दह्यामध्ये परिवर्तन होत असताना, दुधातील लॅक्टोज चे लॅक्टिक अॅसिडमध्ये रूपांतर होत असते. त्यामुळे ज्यांना दूध पचत नाही, त्यांनी दह्याचे सेवन नियमित करावे.

दह्यामध्ये असलेल्या कॅल्शियम आणि रिबोफ्लाविन ह्या घटकांमुळे शरीरातील हाडांचा, ओस्टीयोपोरोसीस सारख्या व्याधीपासून बचाव होतो. ह्या व्याधीने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी दिवसातून किमान एकदा तरी दह्याचे सेवन अवश्य करावयास हवे, असे आहारतज्ञांचे मत आहे. दह्यामध्ये अनेक रोगांवर मात करणारी गुणकारी तत्वे आहेत. पोटाशी निगडीत विकार असणाऱ्यांनी दह्याचे सेवन करावे. जुलाब किंवा बद्धकोष्ठ यापैकी कशाचाही त्रास होत असल्यास दह्याच्या सेवनाने आराम पडतो. दह्यामध्ये असलेल्या लॅक्टोबॅसिली नामक बॅक्टेरिया मुळे पोटाशी निगडीत विकार बरे होण्यास मदत मिळते.

दह्याच्या सेवनाने कोलनचे आरोग्यही चांगले राहते. मोठ्या आतड्याच्या मुख्य आणि सर्वात लांब भागाला कोलन म्हणतात. दह्याच्या नियमित सेवनाने दह्यातील बॅक्टेरियामुळे कोलनचे आरोग्य सुधारून, कोलनचा कर्करोग होण्याची संभावना कमी होते. याशिवाय त्वचेशी निगडीत समस्यांमध्ये ही दही किंवा ताकाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. दह्याने किंवा ताकाने पोटामध्ये शीतलता जाणवते. त्यामुळे सतत खाज सुटणे, त्वचेवर लाल चट्टे उठणे, अंगाची आग होणे, ह्या तक्रारी पुष्कळ प्रमाणात कमी होतात. तसेच निद्रानाश असलेल्या व्यक्तींनी रात्री झोपताना दह्याने डोक्याची मालिश करावी व आपल्या आहारात दह्याचा नियमित समावेश करावा. दह्यामध्ये गूळ मिसळून खाल्ल्यास कामोत्तेजना वाढते. वजन घटविण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींनी लो-फॅट दह्याचे सेवन करावे.

दह्यामध्ये झिंक, कॅल्शियम, जीवनसत्व बी१, बी२, बी६, आणि यीस्ट ही तत्वेही असतात. झिंक असल्याने दह्यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुण आहेत. त्यामुळे त्वचेवरील मुरुमे कमी होण्यास मदत होते. तसेच दह्यामध्ये असेलली एन्झाईम्स त्वचेला आर्द्रता देतात, त्वचेवरील रंध्रांचा आकार कमी करतात, आणि त्वचा मुलायम, सतेज बनवितात. दही केसांच्या आरोग्यासाठी देखील अतिशय फायदेशीर आहे.

टीप : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *