महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.१३ एप्रिल । चैत्र शुद्ध गुढीपाडवा व मराठी नववर्षाप्रारंभ निमित्त आज (मंगळवार) श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व गाभाऱ्यात फुलांची आकर्षक आरास करण्यात आली. यामुळे श्रीं चा गाभारा मनमोहक दिसत आहे. सुमारे 5 टन फुलांचा याकरिता वापर करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
चैत्र शुद्ध गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात, तसेच नामदेव पायरी या ठिकाणी विविध फुलांची रंगसंगती वापरून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यातही गुलाब, शेवंती, झेंडू, कामिनी, ब्लु डिजी आदी प्रकारची 5 टन फुले वापरण्यात आली आहेत.
चिखली, पुणे येथील भाविक नवनाथ मोरे व नानासाहेब मोरे यांनी मोफत फुलांची आरास करण्याची सेवा केली आहे. तर सजावट करण्याचे काम पंढरपूर येथील शिंदे डेकोरेटर्स व मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी केले आहे, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुडलवाड यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल मंदिर 30 एप्रिल पर्यंत भाविकांसाठी दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. असे असले तरी घर बसल्या भाविकांना मंदिर समितीच्या अधिकृत वेबसाईट तसेच विविध प्रसार माध्यमाद्वारे मंदिरात करण्यात आलेली आरास पाहता येणार आहे.