महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.१४ एप्रिल ।कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन मिळवण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र रेमडेसिवीर हे कोरोनावर प्रभावी असल्याचा कोणताही पुरावा नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) म्हटले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना रेमेडेसिवीर का दिले जात आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
डब्लूएचओचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन आणि डॉ. मारिया वॅन केरखोव यांनी एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत रेमेडेसिवीरबाबत महत्वाची माहिती दिली आहे. रेमेडेसिवीरच्या परिणामकारकतेबाबत अलीकडेच पाच चाचण्या करण्यात आल्या. कोरोनामुळे होणारे मृत्यू कमी करण्यास तसेच रुग्णाला व्हेंटिलेटरवर जाण्यापासून वाचवण्यात रेमडेसिवीरची मदत होत नाही, असे या चाचण्यांमधून समोर आल्याचे डॉ. स्वामिनाथन यांनी मुलाखतीत म्हटले आहे. रुग्णांच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा होत असली तरी रेमडेसिवीरच्या आणखी वैद्यकीय चाचण्या सुरू असून त्यावर आमचे लक्ष आहे. त्या चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर रेमेडेसिवीरसंदर्भातील गाईडलाईन्समध्ये सुधारणा केली जाईल असे डॉ. मारिया यांनी म्हटले आहे.
लस आली असली तरी कोरोनाचा शेवट दूर
जगभरातील अनेक कंपन्यांनी कोरोनावर प्रभावी लस तयार केली असून आतापर्यंत 78 कोटी नागरिकांची लसीकरणही पूर्ण झाले आहे. तरीही एवढय़ात कोरोना हद्दपार होणार नसून त्याचा शेवट खूप दूर असल्याचा धक्कादायक खुलासाही ‘डब्लूएचओ’चे प्रमुख टेड्रोस अदानोम गेब्रेयसस यांनी केला आहे. त्यामुळे लस घेतली तरी कोरोनाबाबत खबरदारी घ्यावीच लागणार हे स्पष्ट झाले आहे.
मास्क लावणे, सुरक्षित अंतर हाच उपाय
कोरोनाला दोन हात दूर ठेवायचे असेल तर मास्क लावणे, सुरक्षित अंतर पाळणे हाच सर्वात प्रभावी उपाय आहे. तसेच कोरोना रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य उपचार करणे आणि त्यांच्या संपर्कात आलेल्याचा शोध घेणे हाच संक्रमण रोख्याचा प्रभावी मार्ग असल्याचे गेब्रेयसस यांनी सांगितले आहे.