‘केंद्राच्या निर्णयाचा अभ्यास करू : शिक्षणमंत्री शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ; दहावी परीक्षेबाबत राज्यातही फेरविचार होण्याची शक्यता,

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.१५ एप्रिल ।केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने (सीबीएसई) देशातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात होणारी इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली आहे. केंद्रीय मंडळाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा होणार का, असा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला असून शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ‘केंद्राच्या निर्णयाचा अभ्यास करण्यात येईल’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्राच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री गायकवाड यांनी समाधान व्यक्त केले. ‘विद्यार्थ्यांची सुरक्षा आमच्यासमोरचा सर्वात प्राधान्याचा विषय आहे. त्यामुळे महाराष्ट्राने सर्वप्रथम राज्य मंडळाच्या परीक्षा मे, जूनपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. तसेच इतर मंडळांनी आमच्याप्रमाणे विचार करावा,’ असे आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंडळाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच मागच्या आठवड्यात सावंत यांनी दहावी, बारावीच्या केंद्रीय मंडळाच्या परीक्षांसंदर्भात केंद्राने पुनर्विचार करावा, असे पत्र केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांना पाठवले होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान राज्यातील विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास सत्ताधारी शिवसेनेच्या युवा सेनेने मोठा विरोध दर्शवला होता. त्यातून राज्यपाल आणि विद्यापीठ अनुदान आयोगाशी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने थेट पंगा घेतला होता. अखेर हो- नाही म्हणत विलंबाने का होईना, राज्याला परीक्षा घ्याव्याच लागल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *