नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा ; निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे, ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.१५ एप्रिल । गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता , मात्र आताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे त्यामुळे ब्रेक दि चेन मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला अधिक दक्ष राहण्यास सांगितले.

आज ते सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी , पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे ही बैठक आयोजित करण्यात आली होती.अंमलबजावणी करतांना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा असेही मुख्यमंत्री म्हणाले.

या बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, तसेच राज्याच्या व जिल्ह्यांच्या टास्क फोर्सचे डॉक्टर्स आदींची उपस्थिती होती.

यावेळी राज्य शासनाने दुर्बल घटकातील व गरीब लोकांसाठी जाहीर केलेले आर्थिक सहाय्य व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचावे तसेच कोणत्याही तक्रारी येणार नाही यादृष्टीने चांगले नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *