पवित्र रमजान महिन्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सुचना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । नांदेड जिल्हा प्रतिनिधी: संजीवकुमार गायकवाड । दि.१६ एप्रिल। कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) च्‍या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्‍या परिस्थितीचा विचार करता यावर्षी पवित्र रमजान महिना साजरा करतांना जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत.

पवित्र रमजान महिन्‍यात मुस्लिम समाजामध्‍ये मोठया संख्‍येने मशिदीमध्‍ये जाऊन सार्वजनिकरित्‍या नमाज अदा करण्‍याची प्रथा आहे. या कालावधित मुस्लिम समाज बांधव नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येतात. कोरोना विषाणूंचा संसर्ग लक्षात घेता पवित्र रमजान महिन्‍यात मुस्लिम बांधवांनी आपले नियमित नमाज पठण, तरावीह तसेच सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्‍या घरातच साजरे करावेत. याचबरोबर पुढील बारा सुचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. सुचना पुढीलप्रमाणे आहेत.

सार्वजनिक ठिकाणी एकावेळी पाचपेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींनी एकत्र न येता सोशल डिस्‍टन्‍सींग व स्‍वच्‍छेतच्‍या सर्व नियमांचे काटेकोरपणे (मास्‍क,सॅनिटायझर इत्‍यादी) पालन करुन पवित्र रमजान महिना अत्‍यंत साधेपणाने साजरा करावा.
सेहरी व इफ्तारच्‍या वेळी अनेक फळ व इतर अन्‍नपदार्थ विक्रेते यांच्याकडे गर्दी होण्याची शक्‍यता आहे.त्‍याअनुषंगाने स्‍थानिक प्रशासनाने याबाबत योग्‍य ती उपाययोजना करावी.
कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणीही मशिदीमध्‍ये दुवा पठणाकरीता एकत्र जमू नये. आपापल्‍या घरातच दुवा पठण करावे.
शब-ए-कदर ही पवित्र रमजान महिन्‍याच्‍या 26 व्‍या दिवशी साजरी करण्‍याची प्रथा आहे. या निमित्‍ताने मुस्लिम बांधव तरावीह संपल्‍यानंतर आपल्‍या विभागातील मशिदीमध्‍ये रात्रभर कुराण पठण व नफील नमाज अदा करतात.परंतू यावर्षी सर्व मुस्लिम बांधवांनी सदर धार्मिक कार्यक्रम आपापल्‍या घरात राहूनच करावेत.
पवित्र रमजान महिन्‍यात बाजारामध्‍ये सामान खरेदीकरीता गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.तसेच याबाबत स्‍थानिक प्रशासनाने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले असल्‍यास त्‍याचे तंतोतंत पालन करण्‍यात यावे.
धार्मिक स्‍थळे बंद असल्‍याने वाझ कार्यक्रमांचे आयोजन शासनाच्‍या नियमांचे पालन करुन बंद जागेत शक्‍यतो ऑनलाईन पध्‍दतीने आयोजित करण्‍यात यावेत.
कोवीड-19 या विषाणूच्‍या अनुषंगाने राज्‍यात फौ.दं.प्र.सं.कलम 144 लागू असल्‍याने तसेच रात्रीची संचारबंदी असल्‍यामुळे फेरीवाल्‍यांनी रस्‍त्‍यावर स्‍टॉल लावू नयेत तसेच नागरिकांनी विनाकारण रस्‍त्‍यावर फिरु नये.
या पवित्र रमजान महीन्‍यात कोणत्‍याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक,सामाजिक,सांस्‍कृतीक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात येऊ नये.
धार्मिक स्‍थळे बंद असल्‍याने मुस्लिम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते,राजकीय नेते आणि स्‍वयंसेवी संस्‍थांच्‍या माध्‍यमातून पवित्र रमजान महिना साधेपणाने साजरा करण्‍याच्‍या अनुषंगाने जनजागृती करण्‍यात यावी.
पवित्र रमजान महिन्‍यात सोशल डिस्‍टन्सिंगच्‍या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्‍यक आहे.तसेच मास्‍क व सॅनिटायझरचा वापर करण्‍याबाबत काळजी घेणे अत्‍यंत आवश्‍यक आहे.
जिल्‍हयातील कोवीड-19विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शासनाच्‍या मदत व पुनर्वसन, आरोग्‍य,पर्यावरण,वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच महानगरपालिका, पोलीस प्रशासन,स्‍थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्‍या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्‍यक्ष रमजान सण सुरु होण्‍याच्‍या दिनांकापर्यंत कार्यक्रम सुरु होण्‍याच्‍या मधल्‍या कालावधीत शासनस्‍तरावरून आणखी काही मार्गदर्शक सूचना प्रसिध्‍द झाल्‍यास त्‍यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील.
या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्‍काळ कार्यवाही करण्‍यात यावी. आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था,अथवा समुह,भारतीय दंड संहिता 1860,साथरोग प्रतिबंधक कायदा 1897,फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005, मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील.परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्‍या कृत्‍यासाठी कोणत्‍याही अधिकारी,कर्मचारी यांचे विरुध्‍द कार्यवाही केली जाणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *