लातूरमध्ये पोकलेनचा स्फोट; हवेत उडालेले पार्ट्स लागून दोन जण ठार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ; संजीवकुमार गायकवाड । लातूर । दि.१९ एप्रिल । जिल्ह्यातील मौजे देवकरा गाव शिवारात रात्री प्रभाकर मुरकुटे यांच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरु असताना विचित्र घटना घडली आहे. पोकलेनच्या मदतीने विहिरीचे काम जलद गतीने करत असताना रात्री ८.३० वाजता पोकलेनचा भीषण स्फोट झाला. यावेळी पोकलेनचे सर्व लोखंडी सामान आणि त्याचे स्पेयर पार्ट हवेत उडाले.हवेत उडालेले स्पेयर पार्ट्स लागून दोन जण ठार झाले आहे.

विहिरीचे खोदकाम सुरु असताना पोकलेनला भीषण आग लागली होती. त्यामुळे झालेला मोठा आवाज ऐकून लोक घटनास्थळी धावले.या घटनेत पोकलेनचे उडालेले भाग बाजूलाच उभे असलेले प्रभाकर मुरकूटे आणि दहिफळे यांच्या अंगावर पडले. त्यामुळे या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती किणगाव पोलीस ठाण्यास मिळताच तत्काळ अहमदपूर येथून अग्निशमन दलाच्या गाडीस पाचारण करण्यात आले.अग्निशमन दलाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

पोकलेनमध्ये डिझेल असल्यामुळे आग धुमसतच होती.त्यामुळे आग उशिरा आटोक्यात आली. यात पोकलेन चालक गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर त्याला लातूरमधील अंबाजोगाई येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.विजेच्या तारेला पोकलेनचा स्पर्श झाल्यामुळे स्फोट झाला असल्याचं बोललं जात आहे. परंतु हि घटना नेमकी कशी घडली याचा तपास सुरु आहे.

या घटनेतील तीन व्यक्तींपैकी दोन जणांचा जीव गेला आहे,तर एकजण गंभीर जखमी आहे. आताच घटना कशी घडली हे सांगता येणार नाही.चौकशी सुरु आहे,अशी माहिती किणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी शैलेश बंकवाड यांनी दिली आहे. दरम्यान,ही घटना नेमकी कशामुळे घडली पोकलेनसारख्या वाहनाचे पार्ट हवेत उडून कसे गेले? याबाबत सध्या अनेक तर्क लावले जात आहेत.याचे चित्र पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल.दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *