कार्यक्षमता , मजबुती ,क्षमता , दीर्घ जीवन व्यायामाचे अनेक फायदे ; व्यायाम हा नित्याचा कार्यक्रम असला पाहिजे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । लक्ष्मण रोकडे । दि.२५ एप्रिल। पुणे । व्यायामाने शरीर तंदुरूस्त राहते. मन ताजेतवाने राहते. त्यामुळे व्यायाम हा आपला नित्याचा कार्यक्रम असला पाहिजे असे आपण अनेकवेळा शाळातील पुस्तकात वाचतो आणि इतरही अनेक कार्यक्रमातून आपल्याला ऐकायला, वाचायला मिळत असते. एवढे असूनसुध्दा नित्य किंवा अधूनमधून व्यायाम करणार्‍यांची संख्या समाजात कमीच आहे.नित्य कसला ना कसला व्यायाम करणार्‍या लोकांना तो न करणार्‍यापेक्षा  वेगळे फायदे होत असतात. 

समन्वय – आपल्या शरीरामध्ये मेंदू, हृदय, हात, पाय इत्यादी अनेक अवयव दोन दोन असतात. डावे आणि उजवे. त्यांच्यात जेवढा समन्वय चांगला असेल तेवढा जीवनाचा दर्जा चांगला असतो. त्यामुळे डाव्या आणि उजव्यामध्ये समन्वय चांगला साधण्यासाठी व्यायामाची गरज असते.

कार्यक्षमता – व्यायाम करणार्‍यांची उर्जा पातळी चांगली असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा कितीही भार पडला तरी तो त्यांना सहन होतो आणि ते उत्तम कार्यक्षमतेने काम करू शकतात. कारण त्यांच्या शरीरातील चयापचय क्रिया उत्तम चालत असते.

मन – व्यायाम करणार्‍यांची विचार करण्याची पध्दत सकारात्मक असते. त्यामुळे त्यांचे उत्पादकताही चांगली असते आणि कमी उर्जेमध्ये, कमी वेळेमध्ये काम करण्याची क्षमता त्यांच्या विकसित झालेली असते. कोणत्याही गोष्टीचा आळस येत नसल्यामुळे त्यांना कोणतेही काम सोपेच वाटते.

मजबुती – व्यायाम करणार्‍या व्यक्तीची हाडे मजबूत असतात. त्यामुळे पडणे, धडपडणे, मुरगळणे, आखडणे, करक लागणे अशा गोष्टींचा त्रास त्यांना होत नाही. परिणामी अशा छोट्या छोट्या तक्रारींनी शक्ती वाया जाण्याचे प्रमाण त्यांच्यात कमी असते.

दीर्घ जीवन – व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते. कारण व्यायामामुळे शरीरातील वृध्दत्वाकडे जाणारी प्रक्रिया मंद होत असते. हे जीवन केवळ दीर्घच असते असे नव्हे तर ते तुलनात्मकरित्या वेदनांपासून मुक्त आणि अनेक प्रकारच्या पीडांपासून दूर असते.

त्वचा, केस आणि नखे – व्यायाम करणार्‍यांच्या शरीरात रक्तप्रवाह वेगाने वाहत असतो आणि त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम शरीरावर होतातच पण ते त्वचा केस आणि नखांवर प्रतिबिंबित होत असतात. नियमित व्यायाम करणार्‍यांचे केस भराभर वाढतात. त्याच्यावर चकाकी असते. त्वचा नितळ असते आणि नखांची वाढसुध्दा निरोगीपणे होत असते.

रोग प्रतिकारशक्ती – व्यायाम करणार्‍यांची रोग प्रतिकारशक्ती चांगली असते. त्यामुळे वारंवार होणारे अपचन, सर्दी, खोकला, फ्ल्यू सारखे संसर्गजन्य रोग यापासून ते दूर राहतात आणि कर्करोग, हृदयविकार, रक्तदाब, पित्त अशा गंभीर विकारांपासूनही ते मुक्त असतात.

व्यक्तिमत्त्व – व्यायाम करणार्‍याचे शरीर सुडौल असते. उंची, जाडी, वजन यांचा योग्य समतोल त्यांच्या शरीरात साधलेला असतो. त्यामुळे त्यांचे दिसणे हेही मोठे चैतन्यदायी असते. त्याचबरोबर त्यांच्या हालचाली डौलदार आणि सहज असतात. बेंगरुळपणाचा त्यात अभाव असतो.

क्षमता – व्यायाम करणार्‍याचे हृदय निरोगी असते. त्यामुळे हृदयाचे ठोके सामान्य असतात. फुफ्फुसांवरही ताण पडला तर सहन होतो. त्यांचा श्‍वास चांगला असतो. रक्तवाहिन्या निर्दोष असतात. त्यामुळे त्यांना हृदयविकारापासून मुक्ती मिळते.

प्रवृत्ती – व्यायाम करणार्‍यांना तणावाचा चांगला सामना करता येतो आणि त्यांच्या शरीरातील विविध हार्मोन्सचे स्रवणे सामान्य असते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास आणि आनंद या दोन्हीत वाढ झालेली असते. ते मानसिकदृष्ट्यासृध्दा उन्नत जीवन जगत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *