महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.६ मे । नांदेड । संजीवकुमार गायकवाड ।जिल्हयातील धर्माबाद नगरपालिकेच्या त्या ११ सफाई कामगारांना कायमस्वरूपी आदेश देण्यासंबंधी नगरपालिका शासन व प्रशासन उदासीन असल्याचे चित्र दिसत असून, उच्च न्यायालयाच्या आदेशालाही केराची टोपली दाखवत त्या कामगारांना पराकोटीचा मानसिक त्रास देणे चालू केले आहे.
या प्रकरणी सन 2014 पासून पाठपुरावा करून ठळक वृत्त प्रकाशित करणे चालूच ठेवले आहे.धर्माबाद नगरपालिकेमध्ये कार्यरत असणाऱ्या अकरा वारस सफाई कामगारांना दिनांक 8- 9- 2014च्या प्रस्तावानुसार कायमस्वरूपी कामावर घेणे यासंदर्भात मंजुरी मिळाली होती. माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांच्यासह जून 2019 च्या आदेशान्वये माननीय नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई,माननीय आयुक्त तथा संचालक न.प.प्र. संचालनालय वरळी मुंबई, माननीय जिल्हाधिकारी नांदेड,या सर्व प्रक्रियेमधून निकष पूर्ण पात्र ठरून उपरोक्त अकरा वारस सफाई कामगार हे आपल्या कायमस्वरूपी नोकरी पात्र झाले असतानाही त्यांना मुख्याधिकारी नगरपालिका धर्माबाद यांनी केवळ नियुक्तीचे आदेश पत्र देणेच बाकी असतानानाही अद्यापही ते मिळत नाही.ही खरोखरच कामगारांसाठी शोकांतिका असून नगरपालिका शासन व प्रशासनासाठी मात्र ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
धर्माबाद नगरपालिकेमध्ये जवळपास सर्वच नगरसेवकांनी या नियुक्तीच्या संदर्भात पाठिंबा दर्शविला असतानाही उपरोक्त आकरा वारस सफाई कामगारांना लेखी आदेश का मिळत नाही? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच का यासंदर्भात संपूर्ण धर्माबाद नगरी जाणकारांच्या चर्चेतून ढवळून निघत असून सर्व श्रमिक संघाच्या वतीने कॉम्रेड मुकुंद कदम यांनी हा लढा यशस्वी लढला आहे.
एक मे म्हणजेच कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन या दिवशी उपरोक्त कामगारांना नोकरीत कायमस्वरूपीचे आदेश लेखी स्वरूपात मिळतील अशी आशा होती.पण प्रभारी मुख्याधिकारी तथा धर्माबाद चे तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांनी नगरपालिका बॉडी ने चार दिवस थांबा म्हणून सांगितले अशा पोरकट प्रतिक्रिया दिल्या.पण आज चार दिवस उलटूनही त्यांना आदेश मिळत नाहीत.सर्व कामगारांनी नगरपालिकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना सोडून सर्व नगरसेवकांच्या आज भेटी घेतल्या त्या सर्वांनीच सदरील कामगारांना कायमस्वरूपी आदेश देण्यासंदर्भात समर्थनच दर्शवले! असे असतानाही नियुक्ती पत्र न देण्याचे नेमके कारण काय हा प्रश्न उपस्थित राहत असून उच्च न्यायालयाचा अवमान करीत नगरपालिका शासन व प्रशासन का उदासीन आहेत ते शोध लावण्यास काही हरकत नाही.
चौकट दरम्यान आता उपरोक्त लढ्याच्या पार्श्वभूमीवर कुठलीही लेखी निवेदन न देता कुठल्याही क्षणी नगराध्यक्ष उपाध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या घरावर मोर्चे नेऊन ठिय्या मांडून बसू.. तसेच नगरपालिका प्रशासना समोरही आंदोलने तीव्र करू असा इशारा सर्व श्रमिक संघाच्या वतीने कॉम्रेड मुकुंद कदम यांनी दिला आहे.