‘समाजात माझ्यापेक्षा जास्त योगदान देणारे अनेक लोक ; नितीन गडकरी

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. ७ मे । कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्रातील मोदी सरकारला अपयश आल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात असताना भाजपचे राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनीही कोरोनावरून केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. पंतप्रधान कार्यालय हे सध्याच्या कोरोना संकट काळात काहीच कामाचे नसून सध्याची कोरोनाची परिस्थिती हातळण्याची सर्व जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे सहकारी असणाऱ्या नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी, अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली होती.

सुब्रमण्यम स्वामी यांच्या या विधानावरुन आता नितीन गडकरी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मी काही उत्कृष्ट काम वैगेरे करत नाही. समाजात माझ्यापेक्षा जास्त योगदान देणारे अनेक लोक आहेत. आपले पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी, डॉक्टर, कंपाउंडर, पॅरामेडिकल आणि सरकारी कर्मचारी जीवाची बाजी लावून दिवसरात्र काम करत आहेत, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं. सामाजिक दायित्व म्हणून मी पुढाकार घेतला आहे. सध्या जात, धर्म, भाषा, पक्ष मधे न आणता सर्वांनी मानवतेच्या आधारे सेवा केली पाहिजे. सर्व लोक करत असून आपणही त्यात थोडे प्रयत्न करत आहोत, असं नितीन गडकरी यांनी सांगितले. ते वर्ध्यात बोलत होते.

स्वामी म्हणाले, ‘केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन खूपच नम्र असून, त्यांना त्यांच्या खात्याचे काम मोकळेपणाने करू दिले जात नाही; परंतु, अधिकारवाणीने बोलणाऱ्या नेत्यांसारखे ते नसून खूपच नम्र आहेत. गडकरींसोबत काम केल्याने त्यांच्यातील हा गुण नक्कीच बहरेल,’ नितीन गडकरीच का? असा प्रश्न एकाने विचारला असता स्वामी म्हणाले, ‘कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी योग्य आरोग्य व्यवस्था उभारणीची गरज लागेल. यामध्ये गडकरींनी यापूर्वीच स्वत:ला सिद्ध करून दाखविले आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *