खासगी डॉक्टरांनी सर्वसामान्यांसाठी ‘माझा डॉक्टर ’ म्हणून मैदानात उतरावे ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. १० मे । कोरोनाशी लढा देताना राज्यातल्या खासगी डॉक्टरांनी सर्वसामान्यांसाठी ‘माझा डॉक्टर ’ म्हणून मैदानात उतरावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज खासगी डॉक्टरांशी बोलताना केले. राज्य टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टरांनी मुंबईतल्या खासगी प्रॅक्टिस करणार्‍या सुमारे 700 डॉक्टरांशी संवाद साधताना त्यांना कोरोनावरील वैद्यकीय उपचारांबाबत मार्गदर्शन केले.तिसर्‍या संभाव्य लाटेचा अंदाज घेऊन बालरोगतज्ज्ञांचा ‘टास्क फोर्स’ तयार केला जाणार असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमात आत्तापर्यंत मुंबईतल्या एक हजार डॉक्टरांनी सहभाग घेतला आहे. अशाच रितीने मुंबईबाहेरील राज्यातल्या इतर विभागातल्या डॉक्टरांशीही संवाद साधण्यात येणार आहे.

या उपक्रमाच्या सुरुवातीस बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या काळात वैद्यकीय क्षेत्राकडून सुरू असलेल्या लढाईची प्रशंसा करून येणार्‍या तिसर्‍या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले. कोरोनाकाळात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. कोणत्याही लहान-मोठ्या आजारात रुग्ण पहिल्यांदा आपल्या जवळच्या, परिवाराच्या डॉक्टरशी संपर्क साधतो. त्यामुळे अशा डॉक्टरांची जबाबदारी खूप महत्त्वाची असून त्यांनी सर्वसामान्यांना माझा डॉक्टर बनून मार्गदर्शन केल्यास रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तो रोखता येऊ शकतो,असे ठाकरे म्हणाले.

घरच्या घरी विलगीकरणातील रुग्णांकडे लक्ष देऊन त्यांची विचारपूस करीत राहिल्याने रुग्णाला मानसिक आधारही मिळतो आणि त्याची तब्येत खालावत असेल तर वेळीच त्याला रुग्णालयात दाखल करणे शक्य होते, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या डॉक्टरांनी आपल्या परिसरातल्या कोविड उपचार केंद्र किंवा जम्बो केंद्रांमध्येही सेवा द्यावी, असे आवाहन करताना ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनण्यासाठी कमी आणि दीर्घ काळासाठीचा आराखडा तयार केला असून त्यामुळे लवकरच राज्यांतर्गत ऑक्सिजनची वाढीव निर्मिती शक्य होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *