महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ मे । पारनेर । पहिल्या लाटेत नागरिकांची प्रचंड हेळसांड झाल्यानंतर या लाटेत काही लोकप्रतिनिधींनी जनतेच्या आक्रोशातुन बोध घेऊन रुग्णांच्या व्यवस्थेसाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, मागील लाटेसह या लाटेत देखील रुग्णांसाठी सक्रिय काम करणारे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या कामाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
निलेश लंके यांनी शरद पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटर उभारले आहे. या सेंटरमध्ये एकूण अकराशे बेड असून शंभर ऑक्सिजन बेडची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. भाळवणी (ता. पारनेर) येथील या कोविड सेंटरमध्ये निलेश लंके स्वतः रुग्णांची सेवा करत असून त्यांच्या या कार्याची दाखल जगभरात घेतली जात आहे.
या सेंटरमध्ये रूग्णांसाठी स्वतंत्र थर्मास, मास्क, स्टिमर, नॅपकिन, पाणी बाॅटली, साबण आदी मूलभूत सुविधा दिल्या जात आहे. २४ तास पिण्यासाठी, आंघोळीसाठी, वापरण्यासाठी गरम पाणी. रुग्णांच्या आरोग्यासाठी सकस जेवण, दूध, अंडी, सूप, ड्रायफ्रूट्स असा आहार दिला जात आहे. दरम्यान, त्यांच्या या सेंटरला परदेशातून आर्थिक मदत मिळत आहे. तब्बल १ कोटी २० लाख रुपयांची आर्थिक मदत परदेशातून मिळाल्याची माहिती समोर येत आहे.आतापर्यंत पॅरिस, दुबई, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, पोलंड आणि कॅनडा या देशातून आर्थिक मदत मिळाली आहे. यासोबतच, काही परदेशी नागरिकांनी देखील निलेश लंके प्रतिष्ठानच्या बँक खात्यात पैसे जमा केले आहेत.
निलेश लंके म्हणाले, धान्याचा विचार केला तर 9-10 ट्रक धान्य आलंय. भाजीपाल्यासाठी रांग लागतेय. विशेष म्हणजे पुढील 1-2 महिन्यांसाठी जेवणाच्या पंक्ती बुक झाल्यात. जेवण कुणी द्यायचं, नाष्टा कुणी द्यायचा, ड्राय फ्रूटस् कुणी द्यायचे, फळ कुणी द्यायचं हे आधीच ठरलंय. एखाद्या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जसं लोकं मदत करतात. अगदी तशीच मदत मिळत आहे.