महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. १२ मे । सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे समुद्रात चक्रीवादळ (Cyclone) निर्माण होऊन याचा फटका पश्चिम किनारपट्टीला बसणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली होती. मात्र हवामान खात्यानं नुकत्याच जारी केलेल्या अद्ययावत माहितीनुसार, संबंधित चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, आणि गोव्याच्या किनारपट्ट्यांना बसणार नाही. तूर्तास चक्रीवादळाचा धोका टळलेला आहे. आता हे वादळ ओमानकडे सरकत असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं, 15 मेच्या आसपास अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होईल, याचा फटका महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, गोवा आणि केरळच्या किनारपट्ट्यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता या चक्रीवादळानं आपली दिशा बदलली असून हे वादळ ओमान देशाच्या दिशेनं पुढं सरकत आहे. महाराष्ट्रासह देशाच्या पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका नसला तरी, महाराष्ट्र केरळ, गोवा, कर्नाटक या राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
भारतात उन्हाळा ऋतु जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे. तसेच देशात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच आगमन काही दिवसांवर ठेपलं आहे. अशात अरबी समुद्रात निर्माण झालेली चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा फायदा नैर्ऋत्य वारे सक्रीय होण्यास होणार आहे. त्यामुळे यावर्षी वेळेवर देशात मान्सून दाखल होणार आहे. यंदा 1 जून रोजी मोसमी वारे केरळात दाखल होणार आहेत.