Covid 19: मुख्यमंत्र्यांनी मांडली ‘माझा डॉक्टर’ संकल्पना ; टास्क फोर्सच्या सदस्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद

 28 total views

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १६ मे । करोनाविरोधातील लढ्यासाठी ठाकरे सरकारकडून राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाउन लावण्यात आला आहे. एकीकडे कठोर निर्बंध लावण्यात आले असताना दुसरीकडे करोनाला रोखण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सच्या सदस्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील अनेक डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी डॉक्टरांसमोर ‘माझा डॉक्टर’ अशी संकल्पना मांडत करोनाविरोधातील लढाईत मैदानात उतरण्याचं आवाहन केलं. डॉक्टर संजय ओक, डॉक्टर शशांक जोशी, डॉक्टर तात्याराव लहाने आणि डॉक्टर राहुल पंडित यावेळी उपस्थित होते.

कोविडची लढाई मोठी आहे भयानक आणि जीवघेणी आहे. या लढाईत लढण्यासाठी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्या सर्वांना सोबत येण्यासाठी मी साद घालत असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

गेल्या वर्षी अंधार असताना तज्ज्ञ डॉक्टरांची मोठी मदत झाली. आपल्याकडे उपचार पद्धती काय असली पाहिजे, कशावर कौणतं औषध आणि किती प्रमाणात द्यावं यासाठी मार्गदर्शक तत्वं तयार केली आहेत असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. माझा डॉक्टर संकल्पना मांडताना उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, “जगातील प्रत्येक घरात एक तज्ज्ञ डॉक्टर असतो. प्रत्येकाकडे आपला एक डॉक्टर असतो, त्याचा सल्ला घेऊनच लोक निर्णय घेत असतात. आपल्याही कुटुंबाचा एक फॅमिली डॉक्टर असतो. त्याच्याकडे कुटुंबातील प्रत्येकाची माहिती असते,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

“७० ते ७५ टक्के रुग्ण लक्षणं नसणारे असतात. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसते. पण काही दिवसांनी मृत्यूदर वाढला असं लक्षात येतं. तेथील डॉक्टर रुग्ण उशीरा आल्याचं सांगतात. घरच्या घऱी अंगावर गोष्टी काढल्या जाता. याला आपण लक्ष्मणरेषा म्हणू शकता. ही लक्ष्मणरेषा ओळखायची कशी हे काम तुम्ही करायचं आहे. घरच्या घरी उपचारांचं होम मॅनेजमेंट करण्यासाठी आता शिवधनुष्य उचललं पाहिजे. घरच्या घऱी उपचार घेऊन रुग्ण बरे होऊ शकतात. पण त्यांच्या उपचारावर लक्ष देणं, योग्य औषध देणं यासाठी तुम्हाला काम करायचं आहे,” असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

“कोविड झाल्यानंतर रुग्णाचं शरीर साखरेचं पोतं होऊ नये आणि ज्यांना डाबेटिस आहे ते नियंत्रित ठेवणं, इतर सहव्याधींवरही नियंत्रण ठेवलं गेलं पाहिजे. तर आपल्याला संकट वेळीच रोखता येईल. घऱच्या घऱी उपचाराची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. तसंच नजीकच्या जम्बो सेंटर्समध्ये आपण सेवा देऊ शकलात तर रुग्णांनाही दिलासा मिळेल,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

“चक्रीवादळ आपल्या उंबरठ्यावर आहे. धोका कदाचित टळणार असला तरी किनारपट्टीवर थोड्या प्रमाणात धुमाकूळ घालणार आहे. १ जूनपासून पावसाळा सुरु होईल. त्यानंतर परीक्षा कठीण होणार आहे. साथीचे रोग आणि कोविड याचं आव्हान असणार आहे,” असा इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली.

आपल्याला जे काही समर्थन लागेल ती सरकार म्हणून देण्यास तयार आहोत सांगताना उद्धव ठाकरेंनी डॉक्टरांनी त्यांच्या सर्व समस्या सोडवल्या जातील असं आश्वासन दिलं. संपूर्ण ताकद दिल्याशिवाय हे सरकार थांबणार नाही असंही ते म्हणाले. सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळं बंद आहेत. तो देव तुमच्या रुपात मला दिसतोय. देव असतो तिथे यश मिळतं असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *