हे खेळाडू अजूनही अनफिट; इंग्लंड दौऱयापूर्वी ‘टीम इंडिया’ची डोकेदुखी वाढली

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १७ मे । जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी आणि इंग्लंडविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेपूर्वी ‘टीम इंडिया’ची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे दिसतात. कारण इंग्लंड दौऱयासाठी हिंदुस्थानी संघात निवड झालेले वृद्धिमान साहा, लोकेश राहुल व प्रसिध कृष्णा हे खेळाडू अजूनही अनफिट आहेत. फिटनेस टेस्ट पास केल्यानंतरच या तिघांना संघात सहभागी होता येणार आहे.

‘बीसीसीआय’ने 19 मे रोजी सर्व क्रिकेटपटूंना ‘बीसीसीआय’च्या बायो-बबलमध्ये दाखल व्हायचे आहे. त्यामुळे साहा, राहुल आणि कृष्णा यांच्याबाबत ‘बीसीसीआय’ काय निर्णय घेणार हे बघावे लागेल.

पंतसाठी पर्यायी यष्टिरक्षक
वृद्धिमान साहा व लोकेश राहुल यांची रिषभ पंतला पर्यायी यष्टिरक्षक म्हणून इंग्लंड दौऱयासाठी हिंदुस्थानच्या संघात निवड झाली आहे. प्रसिध कृष्णाची राखीव खेळाडू म्हणून संघात वर्णी लागली आहे. साहाने अखेरचा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2020मध्ये खेळलेला होता.

राहुलला 2019नंतर कसोटी क्रिकेटमध्ये अंतिम 11 खेळाडूंत संधी मिळालेली नाही. त्याने दोन वर्षांपूर्वी वेस्ट इंडीजविरुद्ध अखेरची कसोटी खेळली होती. मात्र, या तंत्रशुद्ध फलंदाजामुळे संघाला बळकटी येते एवढे नक्की. ‘बीसीसीआय’च्या बायो-बबलमध्ये दहा दिवस राहिल्यानंतर ‘टीम इंडिया’ 2 जूनला इंग्लंडला रवाना होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *