पुणे पिंपरी चिंचवड परिसरातही चक्रीवादळाचा परिणाम

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १७ मे । अरबी समुद्रात निर्माण झालेल्या आणि किनारपट्टीजवळून गुजरातच्या दिशेने निघालेल्या चक्रीवादळाचा परिणाम पुणे शहर आणि जिल्ह्य़ातही जाणवला. वादळी वारा तसेच पावसामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागांत ४० ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. काही ठिकाणी वाहनांवर झाडे कोसळल्याने वाहनांचे नुकसान झाले. दरम्यान पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार शहरात आजही ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहून हलक्या पावसाची शक्यता आहे.

चक्रीवादळामुळे शनिवारी (१५ मे) सायंकाळपासून सोसाटय़ाचे वारे वाहत आहेत. शनिवारी रात्री नऊनंतर शहरात वेगवेगळ्या भागात पाऊस झाला. रविवारीही सकाळपासून शहरात ढगाळ स्थिती होती. काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दुपारपासून वारे वाहण्यास सुरुवात झाली. रात्री नऊनंतर वाऱ्यांचा वेग वाढला होता. पाऊस तसेच जोरदार वाऱ्यामुळे मध्यभागासह उपनगरातील वेगवेगळ्या भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. शहरात निर्बंध लागू असल्याने फारशी वाहने रस्त्यावर नाहीत. झाडे कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *