कोरोना टेस्ट किट ! आता 100 रुपयांत होणार चाचणी

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १७ मे । मुंबईत रॅपिड अँटिजेन टेस्ट किट तयार करण्यात आलं आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत डीएसटीच्या मदतीने मुंबईतील स्टार्टअप कंपनी पतंजली फार्माने स्वस्तातलं किट तयार केलं आहे. पतंजली फार्माने तयार केलेलं हे किट गोल्ड स्टँडर्ड आरटीपीसीआर टेस्ट किट आणि सध्या असलेल्या रॅपीड अँटिजेन टेस्टसारखंच असणार आहे.

मुंबईतील या स्टार्टअपने तयार केलेलं टेस्ट किट हे खूपच स्वस्त आहे. यासाठी आयआयटी मुंबईचीसुद्धा मदत झाली आहे. टेस्ट किटची किंमत एका चाचणीसाठी 100 रुपये इतकी आहे. फक्त 100 रुपयांमध्ये मिळणाऱ्या या किटमधून रिपोर्ट तयार होण्यासाठी 10 ते 15 मिनिटे लागतात. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत सेंटर फॉर ऑगमेटिंग वॉर विथ कोविड 19 हेल्थ क्रायसिसने जुलै 2020 मध्ये कोविड 19 रॅपिड टेस्ट किट तयार करण्यासाठी स्टार्टअपला आर्थिक सहाय्य केलं होतं.

पतंजलि फार्माचे संचालक डॉक्टर विनय सैनी यांनी एसआयएनई, आयआयटी मुंबईसह स्टार्टअप सुरु केला. आणि त्यांनी 8 ते 9 महिन्यांतच संशोधन प्रयोगशाळा आणि विकास यासह उत्पादन निर्मिती केली. त्यासाठी आवश्यक परवाने मिळवण्यासाठी अर्जही केले. वेगवेगळ्या कोरोना सेंटरमध्ये असलेल्या प्रोडक्टचे मूल्यांकन आणि पडताळणी केली. त्यातून उत्पादनांमुळे उपचारात कितपत मदत होते आणि त्यात काय सुधारणा गरजेच्या आहेत याची माहिती मिळाली.

विनय सैनी यांनी कोरोना तपासणी किट तयार करण्याबाबत सांगितलं की, कोरोना रुग्ण आणि व्हायरल ट्रान्सपोर्ट मिडियनच्या नमुन्यांमध्ये आमच्या उत्पादनांची अंतर्गत पडताळणी करणं हा एक वेगळा आणि अद्भुत अनुभव होता. यामध्ये कोरोना रुग्णांच्या स्वॅबचा समावेश होता. यावेळी मुंबईतील वेगवेगळ्या कोरोना केंद्रांवर चाचणीवेळी कर्मचाऱ्यांसोबत उपस्थित राहून त्यांना आत्मविश्वास देण्याचं काम केलं.

नव्या किटच्या मदतीने अँटिजेन चाचणीला सुरुवात जून 2021 पासून करण्याचा प्लॅन आहे. रॅपिड टेस्ट 10 ते 15 मिनिटात होते. ग्रामीण भागात, डॉक्टरांचे क्लिनिक आणि जिथं पॅथॉलॉजी, डायग्नोस्टिक लॅब नाहीत अशा ठिकाणी या किटची मदत होणार आहे. किट स्वस्त असल्यानं परवडेल आणि कोरोनाला रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *