महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २२ मे । बार्सिलोनाचा लिओनेल मेसी ला लिगा फुटबॉलमधील अखेरच्या साखळी सामन्याला मुकणार आहे. प्रशिक्षक रोनाल्ड कोमन यांनी मेसीला शुक्रवारी सराव न करण्याची परवानगी दिल्याने शनिवारी ऐबरविरुद्धच्या लढतीत तो खेळताना दिसणार नाही.
ला लिगामधील गेल्या रविवारी झालेल्या ३७व्या साखळी सामन्यात मेसीने एक गोल केल्यानंतरही बार्सिलोनाला सेल्टा व्हिगोकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे बार्सिलोना जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडली. हाच सामना मेसीचा बार्सिलोनासाठी अखेरचा सामना ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गतवर्षीच मेसीने बार्सिलोना सोडण्याचे संकेत दिले होते. मेसीचा बार्सिलोनासोबतचा करार या हंगामाच्या अखेरीस संपणार असल्याने तो पुन्हा करारात वाढ करणार की अन्य एखाद्या संघाशी करारबद्ध होणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
माद्रिद : स्पेनमधील नामांकित ला लिगा फुटबॉलच्या जेतेपदावर रेयाल माद्रिद आणि अॅटलेटिको माद्रिद यांच्यापैकी कोण नाव कोरणार, हे शनिवारी रात्री स्पष्ट होईल. गुणतालिकेत पहिल्या स्थानी असलेल्या अॅटलेटिकोच्या खात्यात ३७ सामन्यांत ८३ गुण असून त्यांची अखेरच्या लढतीत व्हॅलोडिलडशी गाठ पडणार आहे. दुसरीकडे, रेयाल माद्रिदचे ३७ सामन्यांत ८१ गुण आहेत. शनिवारी त्यांच्यासमोर व्हिलारेयालचे आव्हान असेल.
साओ पावलो : कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या संयुक्त यजमानपदाचा हक्क कोलंबियाने गमावला आहे. कोलंबियातील वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे आता फक्त अर्जेटिना येथे १३ जून ते १० जुलैदरम्यान कोपा अमेरिकाचे आयोजन करण्यात येईल.