महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ मे । हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, 1 जून रोजी केरळात मान्सून दाखल होणार आहे. सध्या मान्सून दाखल होण्यासाठी पोषक हवामान निर्मिती झाली असल्याची माहितीही हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तर 10 जून पर्यंत कोकणातही मान्सूनचं आगमन होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार आहे.
21 मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटावर मान्सून दाखल होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आहे. शुक्रवारी अंदमान आणि निकोबार बेटावर मान्सूननं हजेरी लावली आहे. आजही अंदमानमध्ये पावसाचे काळे ढग घोंघावत असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आजही याठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील आठ दिवसांत म्हणजेच दरवर्षी प्रमाणे 1 जून रोजी केरळात मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलं आहे.
Coming 4 days severe weather warnings issued today, 22 May by IMD for Maharashtra.@RMC_Mumbai @RMC_Nagpur pic.twitter.com/9DqyQ6qj2q
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 22, 2021
तत्पूर्वी पुढील 3 ते 4 दिवसांत मध्य महाराष्ट्रासह घाट भागात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सोमवारी आणि मंगळवारी पुणे, सातारा, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात होणार आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. खरंतर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनचं महाराष्ट्रातील हवामानात विविध बदल नोंदले गेले आहे. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे.