महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २३ मे ।झोप हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. काहींना सारखी झोप येत असते तर काहींना झोपेसाठी गोळ्या खाव्या लागतात; पण झोप ही पुरेशी असली पाहिजे, ती कमीही नको आणि जास्तही नको. अमेरिकी संशोधकांच्या मते, एखाद्या प्रौढ व्यक्तीच्या स्वस्थ हृदयासाठी किमान 6 ते कमाल 7 तासांची झोप सर्वोत्तम आहे. डेट्रॉईटच्या हेन्री फोर्ड हॉस्पिटलच्या संशोधकांनी 2005 ते 2010 दरम्यान नॅशनल हेल्थ अँड न्यूट्रिशन एक्झामिनेशन सर्व्हेमध्ये भाग घेतलेल्या 14,079 लोकांबाबतच्या माहितीचे परीक्षण केले. जे लोक 6 तासांपेक्षा कमी आणि 7 तासांपेक्षा जास्त वेळ झोपतात, त्यांच्यात हृदयविकाराने मृत्यूचा धोका अधिक असल्याचे या सर्व्हेतून आढळले. अमेरिकन कॉलेज ऑफ कॉर्डिओलॉजीची एज्युकेशनल साईट कार्डियोस्मार्ट. ओआरजीच्या मुख्य संपादक तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. मार्था गुलाटी यांच्या मते, प्रदीर्घ झोपेपेक्षा झोपेची गुणवत्ता महत्त्वाची आहे.