महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २४ मे । सीबीएसई, आयसीएसई आणि विविध राज्य शिक्षण मंडळाच्या १२ वीच्या परीक्षेवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीगट व राज्यांच्या बैठकीत कुठलाही निर्णय होऊ शकला नाही. १२ वीची परीक्षा घेणे महत्त्वाचे आहे, पण कोरोनाची दुसरी लाट संपल्यानंतर आणि स्थितीत सुधारणा झाल्यानंतरच परीक्षा घ्यावी, असे मत बहुतांश राज्यांनी व्यक्त केले. दिल्ली आणि महाराष्ट्राने परीक्षा रद्द करण्याची शिफारस केली. दिल्लीने तर ‘परीक्षा देणारे १.४ कोटी विद्यार्थी आणि शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या लसीकरणानंतरच परीक्षा घ्यावी, मुलांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकारने फायझर कंपनीशी चर्चा करावी,’ असे स्पष्टपणे सांगितले. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी सर्व राज्यांना २५ मेपर्यंत लिखित स्वरूपात सूचना द्याव्यात, असे सांगितले. बैठकीनंतर ते म्हणाले की,आता २५ मे ते एक जूनदरम्यान परीक्षेबाबत अंतिम निर्णय होईल.
सीबीएसईने परीक्षेसाठी दिले होते दोन पर्याय
1. विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत सर्व विषयांची परीक्षा द्यावी, वेळ दीड तास. पॅटर्न ऑब्जेक्टिव्ह व शॉर्ट आन्सरचा असावा.
2.परीक्षा केंद्रांवर पूर्ण ३ तासांची परीक्षा असावी, पण फक्त प्रमुख विषयांची. उर्वरित विषयांत अंतर्गत मूल्यमापनानुसार गुण द्यावे.
महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, तिसऱ्या लाटेत मुलांवरच परिणाम होण्याची भीती आहे. परीक्षेसाठी ही योग्य वेळ नाही. जर एखाद्या कुटुंबातील कोणाला कोरोना झाल्यास त्या कुटुंबातील परीक्षार्थींची मन:स्थिती कशी असेल हे समजून घेण्याची गरज आहे. त्यांनी ऑनलाइन परीक्षा घेण्याची सूचना केली. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले की, सध्याच्या स्थितीत परीक्षा घेतल्यास संसर्ग पसरणार नाही असे म्हणता येणार नाही. मुले मोठ्या मानसिक तणावातून जात आहेत. अनेक मुलांनी आपल्या लोकांना गमावले आहे, अशा मन:स्थितीत त्यांना परीक्षा देणे अवघड आहे.
नीट-जेईईची तारीख अनिश्चित
बैठकीत नीट-जेईईसारख्या व्यावसायिक कोर्सेसच्या एन्ट्रन्सवरही विचार झाला. पण १२ वीच्या परीक्षा निश्चित झाल्यानंतरच त्यांच्या तारखांवर अतिम निर्णय शक्य आहे.