विदर्भात कृतिशील सक्रियतेने वाचला अनेकांचा जीव – नितीन गडकरी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २४ मे ।कोरोनाची विदारकता साऱ्यांनीच अनुभवली. माणसे एकमेकांना पारखी, हतबल अन् अगतिक झाली. कुठे नाती संपुष्टात आली, तर कुठे कुटुंबच संपले. अशा भयाण वातावरणात संकटावर मात करत मार्ग काढण्यात विदर्भाला चांगले यश आले आहे. परिणामी नागपूर आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राला संकटकाळात जणूकाही प्राणवायू मिळाला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा होता. हाहाकार माजला होता. अशा स्थितीत इंजेक्शन तयार करणाऱ्या विविध कंपन्यांच्या मालकांना फोन करून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग ‌िवभागाचे मंत्री नितीन गडकरी यांनी १५ हजार इंजेक्शन उपलब्ध करून दिले. शिवाय भविष्यात तुटवडा नको म्हणून इंजेक्शनचे उत्पादनच वर्धा येथून सुरू केले. वर्ध्याच्या जेनटेक लाइफ सायन्सेस या औषधी कारखान्यात आता ३० हजार रेमडेसिविर इंजेक्शन रोज तयार होतात. या निर्णयामुळे विदर्भाची गरज तर भागलीच, शिवाय महाराष्ट्राचा इतर भाग व शेजारच्या राज्यांनाही मदत करणे शक्य झाले. वर्धेच्या या कारखान्यात म्यूकरमायकोसिससाठी लागणाऱ्या अॅम्फोटेरेसिन-बी या इंजेक्शनचीही निर्मिती होणार आहे.पहिल्या लाटेनंतर गडकरी यांच्या कार्यालयाकडून पंतप्रधान कार्यालयाला नियमितपणे विदर्भ व महाराष्ट्राची माहिती दिली जात होती. त्यानुसार गडकरी यांच्याकडे राज्यातील २२ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे देशभर अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले. अशा स्थितीत नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन विशाखापट्टणम, भिलाई स्टील प्लँट, जिंदाल स्टीलचे मालक यांच्याशी चर्चा करून ऑक्सिजन देण्याची विनंती केली. त्यामुळे शेकडो रुग्णांचे प्राण वाचले. नागपुरात आता ऑक्सिजनचा तुटवडा नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *