कोरोना लढ्यासाठी आणखी एक अस्त्र ; अँटीबॉडी कॉकटेल औषध भारतात उपलब्ध

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २५ मे । कोरोना महामारीच्या दुसऱया घातक लाटेदरम्यान भारतीयांना आणखी एक अस्त्र प्राप्त झाले आहे. सिप्ला आणि रोशे इंडिया या फार्मा कंपन्यांनी तयार केलेल्या अँटीबॉडी कॉकटेल औषधांची पहिली खेप भारतात पोहोचली आहे. तर याची दुसरी खेप जूनच्या मध्यापर्यंत दाखल होणार आहे.

हे कॉकटेल कॅसिरिविमॅब आणि इम्डेविमॅबद्वारे तयार करण्यात आले आहे. हे औषध देशभरातील सिप्लाच्या वितरण जाळय़ामधून प्राप्त केले जाऊ शकते. भारतात कोरोनाच्या उपचारात आपत्कालीन वापरासाठी मेच्या प्रारंभी या औषधाला मंजुरी मिळाली होती. अमेरिका आणि युरोपीय महासंघात आपत्कालीन वापरासाठी देण्यात आलेल्या डाटाच्या आधारावर सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून (सीडीएससीओ) मंजुरी मिळाली आहे.

एका पेशंटच्या डोससाठी 59,750 रुपये खर्च करावे लागणार आहेत. एक कंबाइंड डोस 1200 एमजीचा आहे, ज्यात 600 एमजी कॅसिरिविमॅब आणि 600 एमजी इम्डेविमॅब सामील आहे. याच्या मल्टी डोस पॅकची रिटेल प्राइस 1 लाख 19 हजार 500 रुपये आहे. कंपनीनुसार एका पॅकमधून दोन रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात. मुख्य रुग्णालये आणि कोविड सेंटरमधून हे औषध प्राप्त करता येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

हे अँटीबॉडी कॉकटेल 12 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे रुग्ण ज्यांचे वजन किमान 40 किलोग्रॅम असेल, अशांवर उपचारासाठी वापरता येणार आहे. तसेच संबंधित व्यक्तीत कोरोनाची तीव्र लक्षणे असले तरीही पण वैद्यकीय ऑक्सिजनची गरज न भासणाऱया रुग्णाकरता हे औषध उपयुक्त ठरणार आहे.

कॅसिरिविमॅब आणि इम्डेविमॅब मोनोक्लोनल अँटीबॉडी आहेत, प्रामुख्याने सार्स-कोव्ह-2 च्या स्पाइक प्रोटीनच्या विरोधात त्या प्रभावी आहेत. मानवी पेशींमध्ये विषाणूचा प्रवेश रोखण्याच्या दृष्टीने याची निर्मिती करण्यात आल्याचे सिप्लाने म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *