‘निसर्ग’प्रमाणेच तौत्के वादळग्रस्तांना भरपाई दिली जाईल ; मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २५ मे ।गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना तौत्के चक्रीवादळाचा तडाखा बसून नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसान ग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ( Cyclone Tauktae Konkan Relief Package )

तौत्के चक्रीवादळानंतर २१ मे रोजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वतः कोकण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला होता आणि तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल व कुणालाही वंचित ठेवणार नाही, असे आश्वस्त केले होते. त्याप्रमाणे त्यांनी आज ही घोषणा केली आहे. तौत्के चक्रीवादळाचा मोठा तडाखा कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांना बसला आहे. त्यातही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. दोन्ही जिल्ह्यांत हजारो घरांची पडझड झाली असून मच्छिमारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक फळबागाही या वादळात उद्ध्वस्त झाल्या असून बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी वादळानंतर २१ मे रोजी कोकणचा दौरा केला होता. रत्नागिरीत आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्गात मालवण भागात पाहणी केली होती. या दौऱ्यात प्रत्यक्ष नुकसानभरपाईची घोषणा त्यांनी केली नव्हती.

कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी मी आलो आहे. प्रत्यक्ष पंचनामे झाले की नुकसानीचा अंदाज घेऊन मदतीबाबत निर्णय घेणार, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या दौऱ्यात दिले होते. शेती आणि फळबाग यांचे पंचनामे दोन दिवसांत करण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. राज्य सरकार शक्य ते सर्व साह्य करेल तसेच केंद्राच्या निकषानुसार मदत केली जाईल, असे त्यांनी नमूद केले होते. केंद्राकडून अधिकाधिक मदत मिळावी यासाठी विनंती केली जाणार आहे. मात्र, वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करता किनारी भागांमध्ये कायमस्वरूपी उपाययोजनांचा विचार करायला हवा, असेही ते म्हणाले होते. या दौऱ्यांनंतर आता मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष मदतीची घोषणा केली असून तौत्के वादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल, असे त्यांनी नमूद केले आहे. त्याचा तपशील देण्यात आला नसला तरी निसर्ग वादळावेळी मदतीसाठी जे निकष निश्चित करण्यात आले होते तेच निकष आता असतील हे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *