महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २५ मे । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कामशेत बोगद्याजवळ भीषण अपघात होऊन या दुर्घटनेत दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. आज (दि. २५) सकाळी आठवाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कामशेत बोगद्याजवळ भरधाव इनोव्हा कारचा पुढचा टायर फुटला. यातच ही इनोव्हा कार पुढे जाणाऱ्या मालमोटारीवर जाऊन आदळली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर दोन जण गंभीर जखमी झाले. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या लेनवर हा अपघात घडला. मृतांमध्ये अभिजीत रामलिंग घवले (वय ४५, डेप्युटी कमिशनर जीएसटी माजगाव, मुंबई ) यांच्यासह शंकर गौडा यतनाल (४५) यांचा समावेश आहे.
तर शिल्पा अभिजीत घवले (४०) आणि पंडित खंडू पवार (३७) हे दोघे जबर जखमी झाले आहेत. शिल्पा या मृत अभिजीत यांच्या पत्नी आहेत. तर पवार हा वाहन चालक आहे. जखमींना उपचारासाठी सोमाटणे येथील पावना हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.