महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २६ मे । देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट काहीसे कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत असतानाच म्युकोरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसने डोके वर काढले आहे. ब्लॅक फंगस झालेल्या रुग्णांची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यात २५ मे २०२१ रोजी रात्री ९.३० वाजेपर्यंतची आकेडवारी देण्यात आली आहे. आतापर्यंत ब्लॅक फंगसची एकूण ११ हजार ७१७ जणांना लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण हे गुजरात आणि महाराष्ट्रात असल्याचे दिसून आले आहे. आरोग्य मंत्रालयानेही ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली आहे. यासाठी अनेक राज्यांनी ब्लॅक फंगसला साथीचा आजार घोषित केले आहे.
Additional 29,250 vials of #Amphotericin– B drug, used in treatment of #Mucormycosis, have been allocated to all the States/UTs today.
The allocation has been made based on the number of patients under treatment which is 11,717 across the country.#blackfungus#AmphotericinB pic.twitter.com/j0LyR6GLjH
— Sadananda Gowda (@DVSadanandGowda) May 26, 2021
केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी ट्वीट करत आकडेवारी जाहिर करताना गुजरातमध्ये २८५९, महाराष्ट्रात २७७० आणि आंध्र प्रदेशमध्ये ७६८ ब्लॅक फंगसच्या रुग्णांची नोंदींची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत ब्लॅक फंगसचे ६२० प्रकरणे असल्याचे सांगितले आहे. पण ही संख्या केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या आकडेवारीत ११९ एवढी दिसत आहे.
कर्नाटकमध्ये ४८१, हरियाणात ४३६, तामिळनाडूत २३५, बिहारमध्ये २१५, पंजाबमध्ये १४१, उत्तराखंडमध्ये १२४, दिल्लीत ११९ आणि छत्तीसगडमध्ये १०३ रुग्ण आहेत. तर चंदीगडमध्ये ८३, गोव्यात १० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त अनेक राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात ब्लॅक फंगसचा एकही रुग्ण आढळलेला नाही. अंदमान निकोबार बेट, अरुणाचल प्रदेश, आसाम, लडाख, लक्षद्वीप, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्किममध्ये एकही रुग्ण नाही. तर पश्चिम बंगाल आणि दमन द्वीपची माहिती यात देण्यात आलेली नाही. दरम्यान म्युकोरमायकोसिस या आजाराला आतापर्यंत १९ राज्यांनी साथीचे आजार अधिनियमांतर्गत अधिसूचित आजार घोषित केले आहे. या अंतर्गत सरकारी अधिकाऱ्यांना माहिती देणे बंधनकारक आहे.