महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २७ मे ।बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय झाला नसून तज्ज्ञांशी चर्चेनंतर याबाबत निर्णय घेऊ, त्यानंतरच तो जाहीर करू, असे मुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी सांगितले. बारावीची परीक्षा देणार्या 19 हजार 241 विद्यार्थ्यांचे भवितव्य या परीक्षेवर अवलंबून असल्याने सरकारला निर्णय घेण्यात वेळ लागत असल्याचे दिसून येते.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने 23 मे रोजी दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. दहावीच्या परीक्षांबाबतचा निर्णय जाहीर करतानाच, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बारावीच्या परीक्षेचा निर्णय दोन दिवसात म्हणजेच बुधवारी जाहीर करणार, असे म्हटले होते. मात्र, बुधवारीही परीक्षांबाबत निर्णय झाला नाही.
मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, बारावीच्या परीक्षांबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. बुधवारीही निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांचे लक्ष उच्च माध्यमिकच्या परीक्षेसंबंधी निर्णयाकडे लागून राहिले आहे. परीक्षा घेण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे चर्चा करूनच निर्णय जाहीर केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. दरम्यान, गुजरात सरकारने बारावीच्या परीक्षा जुलैमध्ये घेणार असल्याचा निर्णय हल्लीच जाहीर केला आहे. त्यामुळे गोव्यातील बारावी परीक्षेच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.